News34 chandrapur
चंद्रपूर - पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा, भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्षातून सरकार काम करेल, पक्षीमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. Sudhir mungantiwar
Eco-pro chandrapur
महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे आयोजित 35 व्या पक्षिमित्र संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते वटवृक्ष आणि दीप प्रज्वलन करून उदघाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, संमेलनाध्यक्ष राजकमल जोब, वन प्रबोधिनीचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपविभागीय अधिकारी श्री. मुरुगानंथन, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह, ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आयोजक इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले.
यावेळी वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विविध पक्षांची चित्रे बघून मन प्रफुल्लीत होते. पक्ष्याचा आवाज मनाला आनंद देतो. पक्षी सृष्टीतील देणगी आहे. देशात २००० पासून २०२२ पर्यंत पर्यावरण समतोल बिघडल्याने पक्ष्याचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. पर्यावरण आरोग्य ठीक नसेल तर पक्षी जगणार नाही. त्यासाठी चिंतन करून संवर्धनाची गरज आहे. त्यासाठी शासनाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्रास पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ताडोबा- अंधारी प्रकल्पात पक्ष्याचे चित्र प्रदर्शन भरविण्यात यावे, त्याची माहिती क्यू आर कोड पद्धतीने देण्यात यावी, महाराष्टाव्यापी छायाचित्र पुरस्कार योजना घेण्याची सूचना मुनगंटीवार यांनी दिली.
स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पक्ष्याचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा यासाठी जनतेच्या सहभागातून, पक्षीमित्रांच्या अभ्यासातून आणि प्रशासनाचा सहकार्यातून प्रयत्न झाले पाहिजे . चंद्रपुरात वाघांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात होते. आता चंद्रपूर बर्ड कॅपिटल (Chandrapur Bird Capital) व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संमेलन अध्यक्ष राजकमल जोब म्हणाले, बहूतेक पक्षीमित्रांचे पक्षी निरीक्षण जलाशयांवरील पाणपक्षी गणने पासून सुरु झालेले आहे. हिवाळ्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या जलाशयांवर येणा-या स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना हा उपक्रम आजदेखील महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने कडे नवीन पक्षी निरीक्षकांना आकृष्ट करु शकतो. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने या उपक्रमाला अधिक चालना देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Bird Friends Meeting
यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे प्रा. डॉ. जयंत वडतकर यांनी भूमिका मांडली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह यांनी नवे संमेलन अध्यक्ष राजकमल जोब यांना महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनांचे ध्वज हस्तांतरित केले.मान्यवरांच्या हस्ते 35 व्या पक्षिमित्र संमेलनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आले. तसेच प्रफुल सावरकर यांच्या निसर्ग संवाद, किशोर मोरे यांचे शबल, रवी पाठेकर यांचे अर्थवन, तर दीपक गुढेकर यांच्या पक्षीवेध पुस्तकाचे प्रकाशन झाले.
त्यानंतर महाराष्ट्र पक्षीमित्र आणि होप संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पक्षीमित्र पुरस्कार २०२२ वितरण करण्यात आले. यात जीवनगौरव पुरस्कार भीमा शंकर कुलकर्णी, पक्षीमित्र व संशोधन पुरस्कार प्रा. डॉ. जयवर्धन बालखंडे, श्रुशूषा पुरस्कार राजकुमार कोळी, पक्षी जनजागृती पुरस्कार अनंत पाटील, उदयमुख पक्षीमित्र पुरस्कार कुमारी अमृता आघाव आणि कुमारी यशश्री उपरीकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा नंदराज यांनी केले.