News34 chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर रेल्वेस्थानकावरील विविध समस्यांसह आणि शहरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समिती मागील अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. या संघर्षाला बऱ्यापैकी यश आले तरी अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, रेल्वे प्रशासनाने या समस्या सोडवाव्या अन्यथा चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समिती आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. Chandrapur railway news
चांदाफोर्ट लाइन मुख्य रेल्वेलाइनला जोडण्याची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी रेल्वे प्रशासनाकडे धूळखात पडली आहे. चंद्रपुरात रेल्वे स्टॉपेज कमी आहे. त्यामुळे अनेकदा येथील प्रवाशांना बल्लारपूर रेल्वेस्थानकावरून प्रवास करावा लागतो.चंद्रपूर हे जिल्ह्याचे आणि औद्योगिक शहर असल्याने या मार्गाने धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना येथे थांबा देण्याची मागणी संघर्षसमितीची आहे. Chandrapur railway station
परंतु, याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय बल्लारपूर - वर्धा डेमू ट्रेन संध्याकाळी ६.१० वाजता सोडण्यात यावी, जेणेकरून कर्मचारी वर्गासाठी सोयीस्कर होईल. तसेच ही गाडी विशेष ट्रेन म्हणून न चालविता नियमित गाडी म्हणून चालवावी, तसेच ही गाडी वर्ध्यावरून पुढे अजनीपर्यंत वाढविण्यात यावी, त्यामुळे संध्याकाळी नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमी खर्चात नागपूरचा प्रवास सोयीस्कर होईल, पुणे-काजिपेठ आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात यावी, चंद्रपूर स्थानकावरील लिप्ट चालू करण्यात यावी, उत्तरप्रदेश, बिहार येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या संख्येत असल्याने हैदराबाद येथून पटणा आणि चेन्नई येथून दरभंगा येथे अंत्योदय एक्सप्रेस चालविण्याची मागणी रेल्वे सुविधा संघर्ष समितीने केली आहे.
Chandrapur railway time table
दरम्यान, या समस्या त्वरित सोडविण्याबाबत एका शिष्टमंडळाने नागपूर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चंद्रपुरात भेट देऊन रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळीसुद्धा सदस्यांनी समस्या सोडविण्याबाबत अवगत केले. अन्यथा १४ मार्चपासून ६ दिवस चंद्रपूर रेल्वेस्थानकावर प्रशासनाला काळे झेंडे दाखविण्यात येणार आहे. यानंतर गांधी चौकात उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला रमणिक चव्हाण, दामोधर मंत्री, नरेंद्र सोनी, पूनम तिवारी, प्रदीप म्हैसुरी, श्याम सारडा, रमेश बोथरा, डॉ. भूपेश भलमे, डॉ. मिलिंद दाभेरे, नरेश लेखवानी, अनीस दीक्षित, अशोक गोहरा उपस्थित होते.