News34 chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) राजेंद्र वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच वैद्य यांचे राजीनामा नाट्य घडले. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहे. एका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत वैद्य यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ते दुखावले. याच नाराजीतून त्यांनी जिल्हाध्यक्षपद सोडल्याची चर्चा आहे. Ncp district president resignation
मूळचे काँग्रेसचे वैद्य यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांना लवकरच जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. सन २०१४ पर्यंत ते या पदावर कायम होते. त्यानंतर संदीप गड्डमवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ( ग्रामीण ) धुरा आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गड्डमवार शिवसेनेत गेले. त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून वैद्य यांच्यावरच पक्षनेतृत्वाने विश्वास दाखविला. तेव्हापासून आजतागायत वैद्य या पदावर कायम आहेत. या काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी वैद्य यांची चांगलीच जवळीक निर्माण झाली. परंतु, जिल्ह्यातील पक्षातंर्गत गटातटाचे राजकारण ते थांबवू शकले नाही. राष्ट्रवादी युवक , शहर काँग्रेसच्या पदाधिकान्यांशी कायम दुरावा राहिला. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे , विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मागील सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवून गेले. त्यावेळीही राष्ट्रवादीत दुफळी कायम राहिली. याचे पडसाद पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्येही उमटायला लागले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांना पक्षाने बढती दिली. ते प्रदेश कार्याध्यक्ष झाले. या रिक्त जागेवर आपल्या मर्जीतील माणूस असावा म्हणून वैद्य यांनी प्रयत्न केले. त्यांनी या पदासाठी राकेश सोमाणे यांना पसंती दिली. पक्षाने फैय्याज शेख यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दिले. त्यामुळे वैद्य कमालीचे नाराज झाले. Chandrapur political breaking
राजेंद्र वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की वर्ष 2014 ते 2019 पर्यंत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अस्तित्व नसताना पक्षाला उभारी दिली, अनेक नगरसेवक, नगरपरिषद, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने मुसंडी मारली मात्र त्यानंतर काही पदाधिकारी हे पद घेत खाजगी कामात गुंतले, पक्ष संघटनेकडे लक्ष कमी झाले, ग्रामीण भागात अनेक प्रयत्न करून पक्ष उभा केला मात्र कालांतराने सर्व पक्ष संघटन काहींनी नेसतोनाबूत केले, कसलीही निवडणूक न लढत फक्त पदासाठी लढणारे आज पक्षात आले.
जिल्ह्यात पद देताना वरिष्ठांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मला विश्वासात घ्यायला हवे होते, 2014 ला राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे विधानसभा निवडणुक लढण्यासाठी आम्ही तिकीट मागितले मात्र उमेदवारी दिली नाही त्यानंतर पक्ष संघटनेकडे आम्ही लक्ष दिलं, 2019 च्या विधानसभेत राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोट्यात तिकीट मिळाले नाही.
नऊ वर्ष जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आता पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी द्यावी , यासाठी राजीनामा दिला असल्याचे राजेंद्र वैद्य म्हणाले.
पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा कुणालाही द्यावी, आम्ही कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सदैव करीत राहू अशी ग्वाही वैद्य यांनी यावेळी दिली.