News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल : मुल तालुका हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असल्याने तालुक्यातील संपूर्ण गावे जंगल व्याप्त आहेत. तसेच बफर झोन जंगलही घनदाट असल्याने आणि बफर झोन लगत असलेल्या जंगलव्यात गावातील हजारो हेक्टर शेती ही वहीवांटीत असल्याने शेतकऱ्यांना कुटुंबाच्या उदर निर्वाहाकरीता शेती करणे भाग पडते.
कारण शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. करीता शेतकरी व शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे गुऱ्हे राखणारे गुऱ्हाखी यांना शेतात किंवा शेतालगत असलेल्या जंगलात गुर्हे चरायला नेण्याशिवाय दुसरी कोणतीही जागा नाही. म्हणूनच मुल तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रात केवळ एका वर्षात वाघाने हल्ला करुन ठार केलेल्या १९ घटना झाल्या असून आजही त्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे मुल तालुका हा वाघाचा तालुका म्हणून प्रसिद्ध झाला आहे. वर्षभरात १९ मानवाचा वाघाच्या हल्यात बळी गेला असून त्यामध्ये अनेक शेतकरी पुरुष तर काही शेतकरी महिलांचा सुद्ध समावेश आहे.
यासोबतच तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना रानटी डूकराणेही अनेक शेतकऱ्यांवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याने निकामी होऊन घरीच उपचार घेत आहेत. सुरवातीला उपचाराचा खर्च वन विभाग करणार असे सांगण्यात येते परंतु प्रत्यक्षात दीर्घ उपचारासाठी कुणी पैसे देत नाही आणि जखमीला जाऊन पाहतही नाही. ही वस्तूस्थिती आहे. त्याच कारणाने मुल तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांनी शेती करणे सोडणार असल्याचे बोलून दाखविले आहे. ज्या शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडते तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडते. कुटुंबातील कमवता व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंब निराधार होते. मुला- मुलींचे शिक्षण थांबते, लग्न कार्य अडते , अशा प्रसंगी शासनही लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती हवालदिल झाली आहे. वाघाने हल्ला करुन बळी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वन विभागाकडून दिली जाणारी रक्कम अजूनही दील्या गेली नाही, शेतकऱ्याला मिळलीही नाही. त्यामुळे वंचित आहेत. त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. करीता वाघाच्या हल्यात ठार झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळाली नाही आणि मिळण्यापासून वंचित आहेत अशा निराधारांना वनविभागाकडून देण्यात येणारी रक्कम त्वरित दिवाळी पूर्वी देण्यात यावी. तसेच रानटी डुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केलेल्या शेतकरी, शेतमजूर यांनाही त्वरित मदत द्यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा अजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे. तसेच वाघाच्या अथवा रानटी डुकराच्या हल्यात ठार किंवा गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मूला - मुलींना अथवा निराधार असलेल्या महिलेला वन विभागाने रोजंदारीवर तात्काळ कामावर घावे. वाघाचा व रानटी डुकराचा बंदोबस्त करण्यासाठी शासन स्तरावरून योग्य नियोजन करावे. डुकराने शेतकऱ्यांच्या धान पिकाचे,तूर,कापूस,सोयाबीन इत्यादी पिकाचेही मोठे नुकसान केले आहे, पण नुकसान भरपाई कधीच दिली जात नाही ही सुद्धा शोकांतिका आहे. आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करावी व गंभीर जखमी असलेल्या रुग्णाच्या उपचाराचा खर्च रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत वनविभाग किंवा शासनाने करावे अशीही मागणी सी.डी. सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केली असून वन विभागाने वाघाचा व रानटी डुकराचा त्वरित बंदोबस्त केला नाही तर मुल तालुक्यातील जनता व शेतकरी, शेतमजूर, गुराखी यांना सोबत घेऊन वनविभागाच्या व शासनाच्या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही संतोष सिंह रावत यांनी दिला आहे.