News34 chandrapur
चंद्रपूर : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हि आग्रही मागणी खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांची असते. त्याकरीता पाठपुरावा देखील ते करीत असतात. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विविध मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देत या संपूर्ण मागण्या काही दिवसातच तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. Mp balu dhanorkar
त्यात प्रामुख्याने घुग्गुस येथील आमराई वार्डात २६ ऑगस्ट २०२२ रोजी भूस्खलन झाले होते. त्यामध्ये एक घर जामिनीच्या आत गेले. त्या परिसरातील १६० कुटुंबाना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना पट्टे व शासनाच्या योजनेतून घरे बांधून हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यामंत्र्यांनी लवकर निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी दिली.
Cm eknath shinde
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे. परंतु शासन याबाबत भरीव मोबदला देत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे पडीत भूमी असलेल्या शेतकऱ्यांना सहा लाख ऐवजी २० लाख प्रति एकर, बिगर सिंचन, असींचीत भूमी असेलेल्या शेतकऱ्यांना ८ लाख ऐवजी २२ लाख प्रति एकर रुपये व बागायती, सिंचन भूमी असलेल्या शेतकऱ्यांना १० लाख ऐवजी २४ लाख रुपये प्रति एकर मोबदला देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ती देखील तात्काळ पूर्ण करणार असल्याचे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कुठलाच आर्थिक आधार नसतो. करता माणूस म्हणून तो घर चालवीत असतो. परंतु जिल्हा परिषद येथील सेवानिवृत्त कर्मचारी आणि शिक्षकांना वेळेवर सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक विवंचनेचा सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना वेळेवर सेवानिवृत्ती वेतन देण्याची लोकहितकारी मागणी यावेळी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना सूचना केल्या.
जिल्ह्यात नगर विकास विभागाकडून भरीव निधी देण्याची लोकहितकारी मागणी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. त्यामध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रा सोबतच वरोरा, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, मूल, घुग्गुस सह इतर नगर परिषद, नगर पंचायतीचा समावेश आहे. या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार बदलल्यानंतर जिल्ह्यातील विविध सिंचन व इतर विकास कामांना स्थगिती देण्यात आली. परंतु हि सर्व विकास कामे लोकहिताचे असून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना लाभदायी ठरणारी आहे. त्यामुळे या विकास कामांवरील स्थगिती काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ती देखील काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
