News 34 chandrapur
चंद्रपूर : मे २०२१ मध्ये राज्य शासनाने दारूबंदी हटविल्यापासून दारू दुकान स्थलांतरण किंवा नवीन दुकानाला मंजुरी देताना अधिकाऱ्यांनी अनेक नियम डावलले. त्याकरिता १८ ते २० कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याची दाट शक्यता असल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची तक्रार पुराव्यासह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर केले असल्याचे त्यांनी सांगीतले. Exciting news
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक मारुती पाटील, दुय्यम निरीक्षक अमित शिरसागर यापूर्वीचे अधीक्षक सागर ढोमकर, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, तालुका भूमिलेखचे उपाधीक्षक मिलिंद राऊत यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नावाचा तक्रारीत समावेश आहे. Liquor shop
नागपूर रोडवरील महालक्ष्मी टाॅवरमध्ये डॉ. राम भारत यांच्या बालरुग्णालयाला लागून, श्रीकृष्ण टॉकीज जवळील केडी कॉम्प्लेक्स व दाताळा रोडवरील निवासी इमारतींमध्ये देशी दारू दुकानाला देण्यात आलेल्या मंजुरीचे वाद शमण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही. दारु दुकानाचे स्थालांतरण व नवीन दुकानाला परवानगी देताना वरिल संबंधित अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून मोठा भ्रष्टाचार केला. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांच्या जवळचे नातेवाईक व मित्र यांच्या संपत्तीची चौकशी करावी, त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी करावी, अशी मागणी देशमुख यांनी एसीबीकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
Anti corruption chandrapur
परवानगी व स्थालांतरणासाठी असे दर
संपूर्ण जिल्ह्यात ९५ च्या जवळपास देशी दारू दुकाने, २६० परमिट रूम, ३५ बिअर शॉपी, सात वाईन शॉप पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. जुन्या देशी दारू दुकान व परमिट रूमसाठी प्रत्येकी एक ते दोन लाख, वाईन शॉपकरिता प्रत्येकी दोन लाख, जुन्या बियर शॉपीकरिता प्रत्येकी २५ हजार रुपये घेत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात नवीन ९० परमिट रूमला मंजूरी देण्यात आली असून प्रत्येक परमिट रूमकरिता शासनाच्या शुल्क व्यतिरिक्त दहा ते बारा लाख रुपये खर्च येत असल्याचे बोलण्यात येते. ६५ नवीन बियर शॉपीला मंजुरी दिली असून प्रत्येक बियर शॉपी करिता शासकीय शुल्का व्यतिरिक्त तीन लाख रुपये खर्च येत असल्याची उघड चर्चा आहे. चंद्रपूर जिल्हा अंतर्गत 8 देशी दारू दुकान व बाहेर जिल्ह्यातून दहा देशी दारू दुकानाचे स्थलांतरण करण्यात आलेले आहे प्रत्येक देशी दारू दुकानाच्या स्थलांतरणाकरिता १५ लाख रुपये तर बाहेर जिल्ह्यातून स्थलांतरित होणाऱ्या वाईन शॉप साठी ५० ते ६० लाख रुपये अतिरिक्त खर्च येत असल्याचे सुद्धा बोलले जाते.
दारु दुकान स्थालांतरण व नव्या दुकानाला परवानगी देताना अधिकाऱ्यांनी मोठी देवाण-घेवाण केली.
निवासी इमारतीत लोकवस्तीमध्ये, शाळा व धार्मिक स्थळांच्या जवळ नियम डावलून दारू दुकानांना मंजुरी दिली. अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही.
-पप्पू देशमुख, अध्यक्ष जनविकास सेना.

