News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदे समोर मागील 19 मे पासून भाजप दलित आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत खाडे व शक्ती केंद्र प्रभारी बब्लू रासेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
पंतप्रधान आवास योजनेची उर्वरित तीसरी रक्कम त्वरित द्यावी आणि नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी नागरिकांवर लादलेल्या थकित गृहकर व पाणीपट्टी करावरील व्याज रद्द करावा, जनहिताच्या या दोन मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून आज उपोषणाचा 5 वा दिवस उजाडला मात्र अजूनही शासनप्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.असे असताना मात्र शहरातील विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपोषण मंडपाला भेट देत आहे. याच श्रेणीत चंद्रपूर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी 22 मे रोजी रात्री उशीरा उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा जाणून घेतली.
मागील अडीच वर्षापासून येथे काँग्रेस व राकाँची सत्ता आहे.तेव्हापासन सत्ताधारी नाना कारणाने सतत चर्चेत आहे.जनतेने यांना कशासाठी पाठवले आणि ही मंडळी काय करीत आहे ? असे सूर उमटत असून शहर विकासाची स्वप्न सर्वसामान्यांनी बघितली मात्र झाले उलटेच.विकासाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब सुरू असून सत्ताधारी मस्त,जनता त्रस्त,अशी परिस्थिती सध्या याठिकाणी अनुभवायला मिळत आहे.जनहित विरोधी निर्णय घेऊन यांनी नागरिकांना अक्षरशः वेठीस धरल्याचे चित्र असून "आम्ही कोणत्या जनमाचे पाप भोगतो" हेच कळेनासे झाले.अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे. 20 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून दिलासा देतील ! अशी आशा होती मात्र असे झाले नाही. यावेळी विरोधी नगरसेवकांनी केलेल्या विरोधा नंतरही यांनी त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही,या उलट विशेष बैठक घेऊन यातील एक मागणी पुर्ण केल्याचा खोटा प्रचार प्रसारमांध्यमांद्वारे करून नगराध्यक्षा दिशाभूल करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.यामुळे नगरपरिषद विरोधात संतापाची लाट पहायला मिळत असून जोपर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.यावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे. देवराव भोंगळे यांच्या भेटी दरम्यान भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरिकांची उपोषण मंडपात मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. दारू दुकानाच्या परवानगीसाठी नगराध्यक्षा तडकाफडकी विशेष सभा घेऊन सर्वानुमते परवानगी देतात,मात्र जनहिताच्या या दोन मुद्द्यांकडे यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहे. आता यासंदर्भात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
