News 34 chandrapur
चंद्रपूर : शहराच्या दाताळा मार्गावरील जगन्नाथ बाबानगर तसेच नागपूर मार्गावरील डॉ. राम भारत यांच्या दवाखान्याजवळ स्थानांतरित देशी दारू दुकानाच्या इमारतींचे बांधकाम अनधिकृत असून निवासी इमारतीमध्ये अवैध गाळे बांधून वाणिज्य वापर सुरू आहे. त्यामुळे दोन्ही अवैध दुकाने स्वतःहून पाडण्याची नोटीस मनपा प्रशासनाने एक महिन्यांपूर्वी बजावले होते. मुदत संपूनही त्या व्यावसायिकांनी कोणतेच पाऊले उचलली नसल्याने मनपाने अवैध दुकाने पाडण्याची कारवाई तातडीने करावी, अशी मागणी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ती अनधिकृत दुकाने पाडण्याची कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा अप्रत्यक्ष इशारा देशमुख यांनी निवेदनातून दिला आहे. Illegal liquor store
ती अनधिकृत दुकाने पाडण्याची कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा अप्रत्यक्ष इशारा देशमुख यांनी निवेदनातून दिला आहे. Illegal liquor store
मागील दीड महिन्यांपासून या दोन्ही देशी दुकानाच्या विरोधात जनविकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूची दुकाने स्थानांतरित करण्याची नियमबाह्य परवानगी दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. पुरावे म्हणून त्यांनी दोन्ही दुकानांच्या इमारतीचे मंजूर नकाशे मनपाकडे सादर केले होते. २८ एप्रिलला मनपाच्या स्थायी समिती सभेत या दुकानांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी लावून धरत मनपा आयुक्तांच्या दालनात तब्बल चार तास जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे मनपा प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे शहरातील सर्व नियमबाह्य दारू दुकानाविरोधात पत्र व्यवहार करणे भाग पडले. यानंतर मनपा प्रशासनाने दोन्ही देशी दारू दुकानाच्या अवैध गाळ्यांचे बांधकाम पाडण्याचा नोटीस इमारतीच्या मालकांना दिला होता. मुदत संपूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने त्या इमारती त्वरीत पाडण्यात याव्या, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे आंदोलकांचे लक्ष
नियमबाह्य दारु दुकानाच्या स्थानांतरणाविरोधात जनविकास सेनेने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले होते. जैन मंदिराच्या बाजूला असलेली बिअर शॉपी, श्रीकृष्ण टॉकीजजवळ केडी कॉम्प्लेक्समध्ये स्थानांतरित देशी दारू दुकानाविरोधातसुद्धा पुरावे दिले होते. यानंतर नागपूर रोड व दाताळा रोडवरील स्थानांतरण रद्द करण्याची कार्यवाही उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे प्रास्ताविक केल्याची माहिती आहे. जैन मंदिराच्या बाजूला असलेली बियर शॉपी बंद करण्याचा अधिकार अधीक्षक पाटील यांना असल्यामुळे या बियर शॉपीला जैन समुदायाचा तीव्र विरोधानंतर टाळे ठोकण्यात आले. देशी दारू दुकान स्थानांतरणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने त्यांच्या भूमिकेकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात दिरंगाई केल्यास त्यांनासुद्धा परिणाम भोगावे लागतील असा इशारासुद्धा देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
