News 34 chandrapur
चंद्रपूर - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर आणि चंद्रपूर केवळ या दोनच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा देऊन सामाजिक क्रांती घडवली. त्यामुळे नागपूर सोबतच चंद्रपूर शहराला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याच सोबत चंद्रपूर शहराला आंबेडकरवादी विचारवंतांचा देखील वारसा आहे. अनेक दलित, विद्रोही साहित्य संमेलने चंद्रपूर च्या भूमीत झाले आहेत. संपूर्ण जगात बाबासाहेबांचे विचार साहित्य सर्वाधिक विकल्या जाणारे व वाचल्या जाणारे साहित्य आहे.
ज्या भूमीत बाबासाहेबांनी वैचारिक क्रांती घडवली तिथे त्यांचे संपूर्ण साहित्य असलेले वाचनालय उभारण्यात आले तर डॉक्टर बाबा साहेबांचे विचार घरोघरी पोहचून समतावादी विचारांचा प्रसार होईल. त्याच सोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाप्रमाणे गोंडवाना विद्यापिठात (gondwana university) देखील आंबेडकर विचार हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा जेणेकरून आंबेडकरांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, पत्रकारिता विचारांचा अभ्यास इथल्या विद्यार्थ्यांना करण्यास मदत होईल.
अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, नगरसेविका सुनीता ताई लोढिया, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता ताई धोटे, शालिनी ताई भगत यांची उपस्थिती होती.
