News34 chandrapur
गडचांदूर :- गडचांदूर शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदुषणामुळे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या रोगांची लागण होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर कंपनीने यासंदर्भात समाधानकारक उपाययोजना करण्याची गरज आहे.
मात्र असे होताना दिसत नाही.या त्रासाला कंटाळून नागरिकांनी अखेर प्रदुषणाविरोधात एकत्रितपणे लढा उभारला असून कृती समितीच्या वतीने विवीध आंदोलने सुरू आहे.वास्तविक पाहता माणिकगड सिमेंट कंपनीने "Dust collector machine" व "इएसपी यंत्रणा" दुरूस्ती करणे आवश्यक आहे.या अनुषंगाने कृती समितीच्या नागरिकांनी फेब्रुवारी महिन्यात आमदार सुभाष धोटे यांची भेट घेतली.या भेटीत आमदारांनी येत्या अधिवेशनात तारांकीत प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले होते. Pollution in gadchandur
असे भेटीस गेलेल्या शिष्टमंडळाकडून कळते. दरम्यान अधिवेशन सुरू असताना विधानसभेत हा प्रश्न चर्चिला जाईल असे वाटले होते.कारण गडचांदूरातील अनेक सजग नागरिकांनी आमदारांना याठिकाणी होत असलेल्या वायू प्रदुषणाबाबत अवगत केले होते.मात्र दुर्दैव असे की,इतका तातडीचा व लोक हिताचा प्रश्न असताना देखील आमच्या लोकप्रतिनिधीने तो सभागृहात मांडला नाही अशी खंत व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मतदार संघाचा भाग नसलेल्या चंद्रपूर, पोंभूर्णा व नागभिड तालुक्याचे प्रश्न आमदार महोदयांनी सभागृहात मांडले. परंतू गडचांदूरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सभागृहात न मांडता नागरिकांना दिलेले आश्वासन हवेतच विरले अशी चर्चा सुरू आहे. नागरिकांना दिलेले आश्वासन न पाळणे, निवडणुकांनंतर लोकांना आपल्या मागे धावायला लावणे, अत्यंत म्हत्वाच्या प्रश्नांना बगल देणे,हे निवडून आलेल्या राज्यकर्त्यांची लक्षणे असतात की काय ? असा प्रश्न गडचांदूरकर विचारत आहे.सदर प्रश्नला जोपर्यंत विधायक मार्गाने वाचा फुटणार नाही तोपर्यंत माणिकगड प्रशासनाची (Manikgad administration) मुजोरी थांबणार नाही. स्थानिक नेत्यांच्या पाठबळावरच ही कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे जळजळीत भावनायुक्त आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे.
