News34 Chandrapur
चंद्रपूर दि. 2 फेब्रुवारी : 30 जानेवारी 2022 रोजी ज्या जिल्हयांमध्ये पहिला डोजचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण 70 टक्के असेल, अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता देण्याच्या शासनाच्या सूचना आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोज 94.71 टक्के तर दुस-या डोसची टक्केवारी 72.21 टक्के आहे. त्यामुळे जिल्हयात सवलती लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
जिल्ह्यात ह्या सवलती लागू :
सर्व national park आणि सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाइन तिकीटासह खुली राहतील. परंतु भेटी देणा-या सर्व अभ्यागतांचे पूर्णपणे लसीकरण अनिवार्य असेल. कोविड - 19 या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियंत्रण अधिका-यांनी गर्दी टाळण्याचे अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. ब्युटी पार्लर, केश कर्तनालयासाठी लागू केलेल्या समान निर्बंधांच्या अधीन स्पा 50 टक्के क्षमतेसह कार्यरत राहू शकतात, अंत्यसंस्कारात सहभागी होणा-या व्यक्तीच्या संख्येवर मर्यादा नसेल.
निर्बंधांना शिथिलता :
जिल्ह्यात आदेशांमध्ये नमूद केलेल्या निर्बंधांना शिथिलता देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार उद्याने, बगीचे खुली राहतील. एम्युजमेंट पार्क, थीम पार्क 50 टक्के क्षमतेसह कार्यरत राहतील. जलतरण तलाव, जल उद्याने 50 टक्के क्षमतेसह खुली राहतील. रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेसह स्थानिक प्राधिकरणाने ठरविलेल्या वेळेनुसार चालू राहतील. शहरी भागाचे अधिकार हे आयुक्त, महानगरपालिका, मुख्याधिकारी नगर परिषद / पंचायत यांना व ग्रामीण भागाकरीता तहसीलदार यांना राहतील. शहरी व ग्रामीण भागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना राहतील. भजन आणि इतर सर्व सांस्कृतिक आणि लोक करमणुकीच्या कार्यक्रमांना हॉल,पंडालच्या 50 टक्के क्षमतेसह परवानगी राहील. यासाठी संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे अनिवार्य असेल.
Restrictions
विवाहामध्ये खुल्या मैदानाच्या आणि बँकेत हॉलच्या क्षमतेच्या 25 टक्के पर्यंत किंवा 200 यापैकी जे कमी असेल तेवढ्या व्यक्तिंना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. यासाठी संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे अनिवार्य असेल. वरील बाबी व्यतिरीक्त उर्वरित बाबींकरिता यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशातील तरतूद लागू राहतील.
Covid 19 guidelines
कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी उपरोक्तप्रमाणे निर्गमित करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.