कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना,भाजपा,शेतकरी संघटना या पक्षांनी आपापले उमेदवार उतरवले आहे. येत्या 21 डिसेंबरला मतदान तर लगेच दुसर्या दिवशी 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या महाराष्ट्रात सेना,काँग्रेस व राकाँ या तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाआघाडी MVA बनवली व सत्तास्थापन करून मुख्य विरोधी पक्ष भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. कोरोना महामारी व इतर संकटांना तोंड देत काही दिवसांपूर्वीच या सरकारने दोन वर्षे पूर्ण केले आहे.असे असताना कोरपना नगरपंचायतच्या निवडणूकीमध्ये या आघाडीत बिघाडीचे चित्र आहे. राजूरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार,शेतकरी संघटना व भाजपच्या माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मागील पाच वर्षे सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला यंदा सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन विरोधी पक्षांपुढे आहे.काँग्रेस विरूद्ध इतर पक्ष असे सध्याचे चित्र असताना काँग्रेस पुन्हा सत्तेत 'कमबॅक' करणार का? हे निकाला नंतरच कळेल. Election korpana
मागील पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत विसर्जन होऊन याठिकाणी नगरपंचायत उदयास आली.17 सदस्य असलेल्या कोरपना नगरपंचायतच्या सार्वात्रीक निवडणूकीत काँग्रेसने 14 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता काबीज केली. या पाच वर्षांत शहरात विविध प्रकारच्या विकासात्मक मुद्दयांवर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून याविषयी स्थानिक नागरिकांपेक्षा विरोधकांनीच मोठे रान उठवल्याचे बोलले जात आहे.आता मात्र मतदारराजा निर्णायक भुमिकेत असून यांचा मत कोणाला मारक तर कोणाला तारक ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.सत्ताधारी आमदार असल्याने याठिकाणी सध्या काँग्रेसचे पारडे जड दिसत आहे तसेच नुकताच राष्ट्रीय गोंडवाना पार्टीने काँग्रेला पाठिंबा जाहीर केल्याने यात भर पडली आहे.यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत असून यंदाही गुलाल आपलाच असे बोलले जात आहे.हिवाळा असूनही याठिकाणी निवडणूकीच्या तापमानात वाढ होताना दिसत असून यावेळी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी इतर पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असे विरोधकांचे सुर असून सध्या प्रचाराला वेग आलेला दिसत नसला तरी पुढे जसजसे दिवस जाईल निवडणूकीत रंग चढणार हे मात्र विशेष.सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचे उमेदवार अग्रस्थानी असल्याचे चित्र दिसत असले तरी शेवटचे चित्र काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अखेर मतदारराजा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पसंदी देतात हे महत्वाचे ठरणार आहे.