चंद्रपूर : प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. शिक्षकांच्या संघटना या समस्यांकडे सातत्याने राज्यसरकारचे लक्ष वेधते आहे. एक पदवीधरांचा प्रतिनिधी, सिनेट सदस्य म्हणून मलाही शिक्षकांच्या समस्यांची जाण आहे. आपणही वेळोवळी या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. भविष्यातही शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असू, अशी ग्वाही देत या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांनी संघटनात्मक लढा द्यावा असे आवाहन आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनी केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ Akhil Maharashtra Primary Teachers Association जिल्हा शाखेच्या वतीने चंद्रपुरात सीडीसीसी बँकेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात पदवीधर आणि विषय शिक्षकांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. संघटनेचे राज्यअध्यक्ष अण्णाराव आडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ॲड. वंजारी यांनी शिक्षक, विषय शिक्षकांना मार्गदर्शन केले. अलीकडे सरकारी नोकऱ्या कमी होत आहे. प्रत्येक सरकार सरकारी नोकऱ्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, शिक्षकांनी वेळोवळी संघटित होऊन समस्यांना वाचा फोडली आणि शासनाकडे पाठपुरावा केला तर यश नक्की मिळेल, असे सांगत शिक्षकांच्या समस्यांवर मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बैठक घेऊन शिक्षकांच्या समस्या त्यांच्या समोर मांडू त्या सोडविण्यासाठी त्यांना बाध्य करू, असे आश्वासनही ॲड. वंजारी यांनी दिले. यावेळी संघटनेचे पुरुषोत्तम गंधारे, उर्मिला बोंडे, सतीश बावणे आदींनी मार्गदर्शन केले. प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेतल्यास संपूर्ण प्राथमिक शिक्षक पाठीशी उभे राहील, असा शब्द सतीश बावणे यांनी आमदार वंजारी यांना दिला. तर १३ ऑक्टोबर २०१६ चा शासननिर्णय रद्द करून सरसकट वेतर श्रेणी लागू करण्याची मागणी जिल्हा नेते पुरुषोत्तम गंधारे यांनी केली. यावेळी अभय कासनगोट्टूवार, मुकुंदा जोगी, भाष्कर वाटेकर विचारपीठावर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास आळे, संभा पारोधे, रवी आसेकर, मुनेश्वर सहारे, राकेश गोनेलवार आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. जिल्हाभरातील प्राथमिक पदवीधर शिक्षक आणि विषय शिक्षकांची मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
