गडचांदूर :- कोरपना तहसील कार्यालयात कार्यरत मंडलाधिकारी नारायण चव्हाण यांनी शासनाचा महसूल वाढविण्या ऐवजी स्वतःचाच महसूल वाढवला तसेच यांनी उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता खरेदी केली आहे.असे आरोप कामगार नेते विजय ठाकरे यांनी आयुक्त महसूल विभाग नागपूर यांच्याकडे ९ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे केली होती.सदर प्रकरणाला गांभीर्याने घेत यासंदर्भात चौकशी करून सत्य आढळल्यास थेट यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.या अनुषंगाने आयुक्त कार्यालयाकडून सदर प्रकरणी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून त्याबाबत अर्जदारास परस्पर अवगत करण्यात यावे.या आशयाचे पत्र आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना प्राप्त झाल्याचे कळते. Inquiry
विजय ठाकरे यांनी केलेल्या तक्रार पत्रातून थोडक्यात असे की,आरटीआय अंतर्गत माहितीवरून हे स्पष्ट होते की मंडल अधिकारी चव्हाण यांनी कोरपना तालुक्यातील तलाठी साजा विरूर गाडेगाव शिवार कवीटगाव सर्व्हे नंबर १३५ आरजी १:३८,सर्व्हे नंबर १३६ आरजी १:३३,सर्व्हे नंबर ९२ आरजी १:७८ यातील सर्व्हे नंबर ९६ विक्री झाली आणि तक्रार देत पर्यंत फेरफार प्रलंबित होते.अशी अंदाजे १० ते १२ एकर जमीन स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावाने खरेदी केली आहे. पैनगंगा रेती उत्खनन,साठवणूक आणि विक्री प्रकरणात बेकायदेशीरपणे बेहिशेबी पैसा कमवून केवळ ६ वर्षाच्या अनुकंपा नोकरीत कोठ्यावधींची माया जमवली आहे.मंडलाधिकारी चव्हाण हे नेमुन दिलेल्या गडचांदूर येथील कार्यालयात कधीच बसत नाही.थुटरा येथील कित्येक वर्ष जुना बसस्थानक जवळील विटाभट्टी लगतचा भलामोठा खड्डा स्वत: उभे राहून बेकायदेशीरपणे भरून दिला.या कामगिरीसाठी यांना सदर सर्व्हे नंबर पैकी काही जागा विकत दिल्याची माहिती आहे.
याच श्रृंखलेत यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत इतर गौण खनिज तस्करांशी संगनमत करून शासनाचा महसूल बुडविला आणि स्वतः कोठ्यावधींची माया जमवली.अशाप्रकारे इतर गंभीर आरोप ठाकरे यांनी तक्रारीत केले असून याचे पुरावे सुद्धा असल्याचा दावा ठाकरे यांनी केला असून मंडलाधिकारी चव्हाण यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करून यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सुद्धा ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव, पालकमंत्री चंद्रपूर, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.अशा अनेक गोष्टींचा समावेश ठाकरे यांनी सदर तक्रार पत्रात केली असून यासंदर्भात आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आले आहे.आता याविषयी निष्पक्षपणे चौकशीची अपेक्षा असून कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाधानकारक चौकशी न झाल्यास याविषयी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती ठाकरे यांनी सदर प्रतिनिधीला दिली आहे.ठाकरे यांनी केलेल्या आरोपांविषयी मत जाणून घेण्यासाठी मंडलाधिकारी चव्हाण यांना बरेचदा दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
तक्रारकर्ता:-विजय ठाकरे.
