चंद्रपूर, ता. ८ : गुरुवार, ता. सात ऑक्टोबरपासून नवरात्रीनिमित्त महाकाली मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या भाविकांना दर्शनासाठी टोकन देण्यात येत आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही, अशांसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, झोन एकच्या सभापती छबूताई वैरागडे, गटनेत्या जयश्री जुमडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी ङाॅ. विजया खेरा आदींची प्रमुख उपस्थिती होती. Covid 19 vaccination
संभाव्य कोरोना लाट रोखून धरण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाकाली मंदिर परिसरात लसीकरण करण्यात येत आहे. चंद्रपूर शहरातील कोरोना लसीकरणाचा टप्पा वाढविण्याच्या दृष्टीने मनपातर्फे खासगी रुग्णालये, सामाजिक भवन, मंदिर येथेही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. महाकाली मंदिर mahakali mandir chandrapur येथे सकाळी सात ते सायकांळपर्यंत लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या मार्फतीने धर्मशाळेच्या मागील भागातून भाविकांना टोकन देण्यात येत आहे.
Token
सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी 6 फुटाचे अंतर राखावे. फेस कव्हर, मास्कचा mask वापर अनिवार्य असेल. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. नागरिकांना परिसरात थुंकण्यास सक्त मनाई असून थुंकणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. धार्मिक स्थळे तसेच परिसरात घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकांनी पालन करणे अभिप्रेत आहे. कोविड-19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अशा परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक असल्याच्या सूचना मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या आहेत.
