(रमेश निषाद बल्लारपुर)
मागील महिनाभरापासून अन्न व पाण्यावाचून मायलेकीचा राहत्या घरात तडफडून मृत्यू झाल्याची हृदयदायक तितकीच समाजमन व मानवी मनाला सुन्न करणारी घटना शनिवारच्या सकाळी कोठारीत उजेडात आली.झेलबाई पोचू चौधरी(७३) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (४५)अशी मृतकाची नाव आहेत. त्यांच्या मृत्युच्या बातमीने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पुरोगामी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भुकेने मायलेकीचा तडफडून मृत्यू झाल्याने ही घटना येथील शासन ,प्रशासनकर्त्याचे कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
बल्लारपूर (Ballarpur) तालुक्यातील कोठारीमधील, वॉर्ड न.५ येथे एका लहानश्या घरात ७३ वर्षीय झेलाबाई पोचू चौधरी व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर(४५) अनेक वर्षांपासून राहिवाशी असून त्या निराधार होत्या.त्यांना मागेपुढे कुणीही नसल्याने त्या एकमेकींच्या आधाराने जगत होत्या. गावात मागून वा कुणी दिलेल्या अन्नावर जीवनचरितार्थ भागवित होत्या. सकाळी व संध्याकाळी गावात फिरत दिसणाऱ्या मायलेकी मागील महिनाभरापासून अचानक दिसेणाश्या झाल्या. त्या दोघ्या आजाराने ग्रस्त व शरीराने अशक्त असल्याने बाहेर चालणे ,फिरणे शक्य होत नसल्याने त्या घरातच पडून राहत होत्या. शेजाऱ्यांनीही त्यांची विचारपुस केली नाही. अशात अन्न व पाणी मिळाले (dies of starvation) नसल्याने त्या घरातच मृत्यू पावल्या होत्या. त्यांच्या घराचे दार उघडेच होते व गावातील मोकाट कुत्रे घरात शिरून त्यांचे अंगावरील कपडे ओढूल्याने त्यांचा मृतदेह नग्नावस्थेत व शरीराचे लचकेही तोडल्याचे दिसून आले. त्या मायलेकीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी व मानवी मनाला सुन्न करून थरकाप उडविणारा होता. शनिवारला सकाळी शेजारी त्यांचे उघड्या घराकडे डोकावून पाहिल्यानंतर त्यास मायलेकीचा मृत्यू झाल्याचे व शरीर अत्यंत गंभीर अवस्थेत दिसून आल्यानंतर वॉर्डातील रहिवासी जमा होऊन पोलिसांना माहिती दिली.ठाणेदार तुषार चव्हाण व त्यांचे सहकारी पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल होऊन नग्न शरीरावर कपडे टाकून प्रेत ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपुरला रवाना केले.
![]() |
सदर घटना राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांना समजताच त्यांनी कोठारीत येऊन मृतकाच्या घराला भेट देऊन पाहणी केली. |
पोलिसांचे अतुलनीय कार्य
गावातील नागरिकांचा अचानक मृत्यू झाल्यास व त्यांना कुणीही नातेवाईक नसल्यास त्यांच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. मात्र या प्रकरणात पोलिसांचे कार्य अतुलनीय होते.
गावकऱ्यांनी केले अंत्यसंस्कार
मायलेकीच्या प्रेताचा अंतिम संस्कार गावकर्यानी निधी गोळा करून केला.गावतील सामाजिक कार्य करणारे युवक नातेवाईक होऊन खांदेकरी बनले व अंतिम यात्रेत गावातील महिला पुरुषांनी अत्यंत वेदनादायी मनाने सहभागी झाले.