आष्टी:- जादूटोणा, करणी, तंत्र-मंत्र, भूत, भानामती याअंधश्रद्धाच्या तसेच बाबा, देव्या, मांत्रिक यांच्या प्रभावात न येता शांततापूर्ण जीवन जगावे. विकास आणि आनंदी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी असे आवाहन अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आष्टी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मार्कंडा (कं) येथे आयोजित जादूटोणाविरोधी कायदा (Anti-witchcraft law) जनजागृती कार्यक्रमात (Awareness campaign) गावकऱ्यांना करण्यात आले.
आष्टी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित सदर प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी विविध अंधश्रद्धांवर चमत्कार भंडफोड प्रात्यक्षिकांसह प्रकाश टाकला तर पोलिस निरीक्षक कुमार सिंह राठोड यांनी जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदींसह गावकऱ्यांशी संवाद साधला आणि अंधश्रद्धामुळे परिसरातील शांतता भंग न करण्याचे आवाहन केले. गावात जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती पत्रके ही वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमात पोलिस उपनिरीक्षक सौ. कांबळे, सरपंच वनश्री चाफले, मुख्याध्यापक बी. टी. घोडाम, माजी सरपंच गंगाधर पोटवार, ग्रामपंचायत सदस्य यांचीपण उपस्थिती होती. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आष्टी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.