कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
"ईडापीडा टळो,सुगीचे दिवसं येवो" अशी प्रार्थना करत वर्षभर कष्ट करणारा बळीराजा पोळा सणाच्या दिवशी मोठ्या थाटामाटात बैलाची पुजा करतो.वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बैलांना यानिमित्ताने श्रावण महिन्याच्या शेवटी महिनाभर उपवास ठेवून शेतकरी हा आपल्या बैलाच्या पुजनाचे कार्यक्रम करतो. कित्येक ठिकाणी तोरणावरून वादविवाद होत असल्याचे प्रकार ही घडत असतात.मात्र कोरपना तालुक्यात एक गाव असे ही आहे जिथे गेल्या २५ वर्षापासून तोरणा शिवाय मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा होतो.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील पिपर्डा या गावामध्ये पोळ्याच्या दिवशी तोरण आणि बैलाच्या जोड्या काढण्यावरून वादविवाद होत होते.वर्ष ९४,९५ च्या काळात याठिकाणी ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण महिलांची सत्ता होती. ९ च्या ९ सदस्य महिला निवडुन आल्या होत्या.त्याकाळी बहुतेक सरपंच फुलाबाई कोडापे तर उपसरपंच शमशाद बेगम ह्या होत्या असे कळते ? तोरण वाद लक्षात घेऊन सैय्यद आबीद अली यांच्या पुढाकाराने त्यावेळचे तत्कालीन ठाणेदार यांच्या उपस्थितीत सर्व गावकऱ्यांनी निश्चय केला की,यापुढे कोणीही पाटील नाही, कोणी लहान व मोठा नाही, कोणाच्याही जोड्या निघणार नाही,आपण सर्वांनी तोरण बंद करायचं.सर्वांनी गावातील मंदिराजवळ यायचं,थाटामाटात जोड्या सजवायचं,रितीनुसार बैलांची पूजा करायची,बँड, ताशे फटाके आतिषबाजी करत मंदिराला रिंगण घालायचं आणि तेथून आपापल्या जोड्या घेऊन घरी जायचं.
तेव्हा पासून मंदिराच्या पारावर समस्त गावकरी महिला,पुरूष,बालगोपाल एकत्र येतात,एकामेकांना पोळ्याच्या शुभेच्छा देतात. यादिवशी शेतकरी तुतारी,काठी पोळ्यात नेत नाही.ही परंपरा गेल्या २५ वर्षांपासून सतत सुरू असून या दिवशी गावातील सर्व जाती धर्माचे लोकं एकत्रीत येऊन मोठ्या आनंद व उत्साहाने सण साजरा करत एकमेकांना शुभेच्छा देतात. याच बरोबर या गावात सर्वधर्म उत्सव अगदी शांततेत व बंधुभावाने पार पडतो हे मात्र विशेष.
