चंद्रपूर : ३ सप्टेंबर रोजी १२० कामगारांना कारखाना व्यवस्थापनाकडून काढून टाकल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटे गोपानी व्यवस्थापनाकडून ईतर सर्व कंत्राटी कामगारांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अचानक एवढ्या कामगारांना जाणीवपूर्वक काढून टाकल्याने जिल्हाभरात खळबळ माजली आहे.
ताडाळी येथील एमआयडीसी परिसरातील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर या कारखान्यातील व्यवस्थापनाने ३ सप्टेंबर रोजी पहाटे सुचनाफलकावर सुचना लावून १२० कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले होते. मात्र याच घटनेची पुनरावृत्ती करत शुक्रवारी पहाटे इतर सर्व कंत्राटी कामगारांना गोपानी कारखाना व्यवस्थापनाने कामावरून कमी केले आहे.
कारखान्यातील कामगार संघटनेमध्ये सहभागी असणाऱ्या सभासदांची संख्या अंदाजे ४५० च्या वर आहे. संघटनेशी संबंधित असलेल्या जवळपास सर्वच कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने कामावरून कमी केले आहे. तसेच कामगार संघटनेशी संबंधित नसलेल्या ईतरही २५० जणांना कारखान्याने कामावरून कमी केले आहे. त्यामुळे कामावरून कमी केलेल्या कामगारांचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती गोपानी स्पंज आयरन कामगार संघटनेचे रमेश बुच्चे यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे सुचनाफलकावर पत्रक चिकटवून उर्वरित कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याची सुचना देण्यात आली. त्यामुळे कामगार वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
------------
कोणत्याही कायद्याला न जुमानता गोपानी व्यवस्थापनाने दडपशाही व मुजोरीचे धोरण सुरू केले आहे. मागील १७ वर्षांपासून कारखान्यात काम करणाऱ्या ४५० कामगारांना व त्यांच्या कुटूंबांना संकटात टाकण्याचे काम व्यवस्थापनाने केले आहे. व्यवस्थापनाने कामगारांना लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावे. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल.
- दिनेश चोखारे,
सभापती, कृ. उ. बा. स. चंद्रपूर तथा
अध्यक्ष, गोपानी स्पंज आयरन कामगार संघटना, ताडाळी.