चंद्रपूर - गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव निवासी 17 वर्षीय सानिका अनमूलवार या मुलीची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सामान्य रुग्णालयात तब्बल दीड तास सानिका ला बघण्यासाठी डॉक्टरच आले नाही, काही वेळात सानिका उपचाराअभावी मृत्यू झाला.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोरोना काळात शून्य नियोजनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता, मात्र त्या परिस्थितीनंतर ही आरोग्य विभाग जागे झाले नाही.
21 ऑगस्टला तोहोगाव निवासी 17 वर्षीय सानिका ची अचानक प्रकृती बिघडली होती, कुटुंबातील सदस्यांनी तिला ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केल्याने तात्काळ सानिका ला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अपुऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या कमतरतेमुळे सानिका वॉर्ड क्रमांक 9 मध्ये तडफडत राहिली, दीड तासानंतर सानिकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
सानिकाच्या मृत्यूनंतर घरच्यांनी आरोग्य विभागावर आरोप लावले असता त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आली, कामावर असलेल्या 8 कंत्राटी डॉक्टरांची सेवा संपुष्टात आल्याने नवी निविदा काढली नाही, त्यामुळे त्या वार्ड मध्ये डॉक्टर नसल्याने तिथे कुणाचेही उपचार होत नव्हते.
जिल्ह्यात विकासाच्या मोठ्या बाता करणारे दमदार पालकमंत्री, खासदार व आमदार असतांना सुद्धा आरोग्य व्यवस्था तोकडीच आहे.
17 वर्षीय सानिकाच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? आरोग्य व्यवस्था की जनप्रतिनिधी?
ग्रामीण भागातून हजारो नागरिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात मात्र प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा त्यांना जीवघेणा फटका बसत आहे.