News34
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - सभापती-ग्राम विस्तार अधिका-याच्या पत्राच्या रंगलेल्या वादात आता वंचित बहुजन आघाडीने उडी टाकली असून पदाचा दुरूपयोग करणा-या सभापतीला पद मुक्त करून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजु झोडे यांनी दिल्याने इकडे आळ तिकडे विहिर अशी पंचायत प्रशासनाची अवस्था झाली आहे.
ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यांत येणा-या कामाचे ई निवीदा न काढता आपण सांगू त्याच कंत्राटदाराला ते काम करण्याचे आदेश मिळाले पाहिजे, अन्यथा महागात पडेल. अशा आशयाचे पंचायत समिती सभापती चंदु मारगोनवार यांचे नांवाने बेंबाळ ग्राम पंचायतीचे ग्राम विस्तार अधिकारी आशिक सुखदेवे यांना पाठविलले पत्र सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनात चर्चेचा झाला आहे. दरम्यान सभापती चंदु मारगोनवार यांनी ग्राम विस्तार अधिकारी यांना मिळालेले पत्र बनावट असून त्या पत्राची फाॅरेन्सीक लॅबद्वारे चौकशी करण्यात यावी. अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे. दुसरीकडे मात्र ग्रामसेवक संघटना सुखदेवे यांचे पाठीशी उभी झाली आहे. शासकिय कामात हस्तक्षेप करून आपल्या मताप्रमाणे न वागल्यास महाग पडेल. अशी सुखदेवे यांना धमकी देणा-या सभापती चंदु मारगोनवार यांचे पासून पंचायत समिती अंतर्गत सेवारत असलेल्या इतरही ग्रामसेवकांना धोकादायक आहे. करीता सभापती चंदु मारगोनवार यांना पदमुक्त करावे. अशी मागणी उचलून धरत आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. सभापती-ग्राम सचिव यांचा वाद विकोपाला जात असतांना सदर वादात आता वंचित बहुजन आघाडीने उडी टाकली आहे. वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजु झोडे यांनी जबाबदारीचे पद सांभाळणा-या सभापती चंदु मारगोनवार यांनी पत्र पाठवुन पदाचा दुरूपयोग केला आहे. शासकिय कामात हस्तक्षेप करणे व महाग पडेल अशी धमकी देणे या अपराधा वरून त्यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई होणे अपेक्षीत आहे. परंतू सभापती चंदु मारगोनवार हे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांचे खंद समर्थक व विश्वासु कार्यकर्ते असल्याने मारगोनवार यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचे कडून प्रशासनावर दबाव येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पंचायत समिती मध्यें प्रवेश करून सभापती चंदु मारगोनवार यांचे विरूध्द आक्रमक आंदोलन करू. असा इशारा राजु झोडे यांनी दिला आहे.
पाणी पुरवठा योजनेत झालेल्या लाखोचा गैरव्यवहाराच्या चौकशी करीता वंचित आग्रही
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत 2013 मध्यें बेंबाळ ग्राम पंचायतीला पुरक पाणी पुरवठा योजना मंजुर झाली. त्या योजनेचे काम सुरळीत होण्यासाठी त्या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी २६ जानवारी २०१३ मध्यें झालेल्या ग्राम सभेच्या माध्यमातून चंदु मारगोनवार यांचे अध्यक्षतेखाली बांधकाम उपसमिती निर्माण करण्यांत आली. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता सतिश गोर्लावार यांचे मार्गदर्शनात कंत्राटदार दिपक गोणेवार यांनी सदर योजनेच्या कामाला उत्साहात सुरूवात केली. परंतु आज ७ वर्षे उलटुन गेले तरी सदर योजना पुर्णत्वात आलेली नाही. त्यामूळे बेंबाळ वासीयांना गडीसुर्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याने तहान भागवावी लागत असतांना अर्धे बेंबाळ आजही पाण्यापासुन वंचित आहे. त्यामूळे एक कोटी रूपये खर्चाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काय झाले. असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. यासाठी ग्रामस्थांनी कित्येक निवेदन देवून आंदोलन केले. त्यावेळेस प्रशासनाने महिण्याभरात सदर योजनेचे पाणी सुरू करू. असे आश्वासन दिले होते. परंतू आज कित्येक वर्षे लोटुनही सदर योजनेचे पाणी बेंबाळ वासीयांच्या तोंडात पडलेले नाही. त्यामूळे सदर योजनेच्या कामात लाखोचा गैरव्यवहार झाला असल्याने योजनेचे काही काम आजही अपुर्णावस्थेत आहे. त्यामूळे सदर सदर योजनेच्या संपुर्ण दस्तऐवजांची व झालेल्या कामाची सखोल चौकशी करावी. अशीही मागणी वंचितचे विदर्भ समन्वयक राजु झोडे आणि जिल्हा संघटक प्रशांत उराडे यांचे नेतृत्वात बेंबाळ वासीय येत्या दिवसात करणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
