कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्पवासी गेल्या अंदाजे ४० वर्षांपासून निर्वासितांचे जीवन जगत असून वीज, पाणी,रस्ते,नाली,घरकुल अंगणवाडी अशा जीवनावश्यक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. या त्रस्त नागरिकांना हक्काचे जीवन जगता यावे यासाठी यांनी अनेकदा संबंधितांकडे पत्रव्यवहार केले.परंतु येथील बालाढ्य माणिकगड सिमेंट कंपनीपुढे हतबल असलेल्यांनी याकडे लक्ष दिले नाही.परिणामी दरवेळी निराशाच पदरी पडली.मुलभुत सुविधा पुरविण्यात शासनप्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे आरोप होत असून शहरातील इतर प्रभागातील नागरिकांना मिळत असलेली सुविधा आम्हालाही मिळावी यासाठी कित्येकदा संबंधितांचे उंबरठे झिजवल्याची जळजळीत भावना सदर कॅम्पवासी व्यक्त करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापुर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,खासदार बाळू धानोरकर हे गडचांदूरात आले असता बंगाली कॅम्प वासीयांनी यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन निवेदन दिले.तसेच जिल्हाधिकारी व आमदार सुभाष धोटे यांनाही निवेदन देण्यात आले.इतरांप्रमाणे आम्हालाही जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळाव्या अशी विनंती वजा मागणी यावेळी करण्यात आली. बंगाली कॅम्पची जागा माणिकगड सिमेंटची असल्याचा वाद सध्या न्यालयात सुरू आहे हे मात्र विशेष.
विश्रामगृह परिसरात सदर समस्येवर चर्चे दरम्यान बंगाली कॅम्पवासीयांनी आपली व्यथा जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडली.राकाँचे राजुरा विधानसभा प्रमुख अरूण निमजे यांनी "फंडामेंटल राईट्स" प्रमाणे यांना मुलभुत सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे असे सांगितले. मात्र आमदार धोटे हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी माणिकगड सिमेंटच्या समर्थनार्थ बोलत असल्याचे जाणवले असे आरोप प्रहारचे सतीश बिडकर यांनी केला असून "अखेर, आमदारांना माणिकगड सिमेंट कंपनीचा ऐवढा पुळका का ?" असा प्रश्न ही बिडकर यांनी उपस्थित केला आहे. सदर कॅम्पच्या जागे विषयीचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. तरीपण या लोकांना पाणी,वीज अशा मुलभूत सोयीसुविधा मिळायला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त होत होते. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आला असून याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
