चंद्रपूर - मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 16 हिंदुस्थान लालपेठ कॉलरी मध्ये सध्या डेंग्यू ने थैमान घातले आहे, मात्र चंद्रपूर मनपा आजही या गंभीर आजारावर सुस्तपणा दाखवीत आहे.
या प्रभागात प्रत्येक 10 कुटुंबामागे 1 सदस्य डेंगू बाधित आढळत आहे, ही चिंतेची बाब असून यावर पालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी प्रभागातील चंदा वैरागडे व महिलांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार व पालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रभागातील महिलांनी मागणी केली आहे की, डेंग्यू बाधितांचे सर्व्हेक्षण करावे, डेंग्यू नियंत्रण बद्दल जनजागृती मोहीम राबवावी, प्रभागातील उघड्या नाल्या व गटारांची साफ सफाई करण्यात यावी, डेंग्यू प्रतिबंधक फवारणी करावी व डेंग्यूची रक्त तपासणी मोफत करावी तसेच चाचणी केल्यावर लवकर रिपोर्ट मिळावी असे नियोजन करण्यात यावे जेणेकरून हा आजाराचा प्रादुर्भाव कमी होईल.
सोबतच या प्रभागात अमृत योजनेचे काम केल्याने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे फुले चौक, नेताजी चौक ते जुनोना चौक हा मुख्य वर्दळीचा मार्ग असून हा मार्ग पूर्णतः खड्ड्यात गेला आहे, पावसाळ्याचे दिवस असून खड्ड्यात पाणी साचल्याने या मार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
या मार्गाचे काँक्रिटिकीरण करण्यात यावे अशी मागणी चंदा वैरागडे, स्नेहल अंबागडे, कल्पना वरभे, रेखाताई वैरागडे, तृप्ती राजूरकर, तेजस्विनी पोडे, लिला बुटले, शिल्पा आंबटकर, अपर्णा धकाते, शारदा आंबटकर, वंदना खेळकर, संगीता टवलारकर, रतीमा निकुरे, अंजु वैरागडे आदींची उपस्थिती होती.