कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर न.प.च्या नगराध्यक्षांनी २० जुलै रोजी बोलावलेली "विशेष सभा समिती" ची सभा नियमबाह्य,बेकायदेशीर असल्याचे म्हणत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी सभा रद्द करावी,यासाठी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना विनंतीचे निवेदन दिले होते.मात्र ठरवल्याप्रमाणे अखेर सभा झालीच.यात ५ पैकी चार विषय मंजूर करण्यात आल्याचे कळते. त्यातील चौथा विषय म्हणजे इतर ठिकाणची दारू दुकान गडचांदूर येथे स्थलांतरीत करणे,हा होता.आणि नेमका यालाच विरोधी पक्ष सदस्यांचा विरोध होता.अगोदरच याठिकाणी ११ च्या जवळपास विदेशी व ४ देशी दारूची दुकाने आहे.त्यावर नगरपरिषद तडकाफडकी विशेष सभा बोलावून इतर विकासात्मक विषयांसह पुन्हा दारू दुकांनचे ठराव मंजूर करीत असल्याचे म्हणत जर अशीच परिस्थिती राहिलीच तर येणाऱ्या काळात गडचांदूरात दारूचा महापूर येणार अशी शंका विरोधी नगरसेवकांनी सदर प्रतिनिधीपूढे व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ८(२) नुसार १/४(एक चतुर्थांश) सदस्यांनी विशेष सभा लावण्याबाबत विनंती अर्ज केल्यास नगराध्यक्षांना सभा लावता येते.परंतू याठिकाणी असे कोणत्याही सदस्यांचे अर्ज नसताना स्वतःच्या अधिकाराने सभा लावून त्यात एकूण ५ विषय ठेवले त्यातील विषय क्रं.४ व ५ हे दारूचे विषय नगराध्यक्षासाठी अती महत्वाचे असल्याचे लक्षात येत आहे.मागील जून महिन्याच्या १७ तारखेला सर्वसाधारण सभा झाली.आता सर्वसाधारण सभा लावता आली असती मात्र दारू दुकानासाठी त्या अर्जदारा सोबत झालेल्या गुप्त करारामुळे सत्ताधाऱ्यांना मोठी घाई सुटली व लगेच त्यांनी तातडीने विशेष सभा लावली.ही सभा केवळ आणि केवळ दारू दुकानाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठीच लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्ष नगरसेवकांनी केले आहे.यातील विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सदरची सभा नियमबाह्य असल्याने सभा रद्द करण्यासाठीचे विनंती अर्ज दिले. परंतू यांच्या अर्जाला मुख्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली.एवढेच नव्हे तर विरोधी नगरसेवकाला सभेची टिप्पणी सुध्दा दिली नाही.यामुळे विरोधी नगरसेवकांनी "टिप्पणी नाही तर सभा नाही" अशी भुमिका घेत सभा रद्द करण्याची मागणी केल्याची माहिती असून सत्ताधाऱ्यांचे दारू दुकानाला ना-हरकत देण्याचे धाडस बघून मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा विरोधी नगरसेवकांच्या त्या मागणीकडे कानाडोळा केल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे.सभेची टिप्पणी नसताना सभा कशी काय घेता ? अशी विचारणा विरोधी नगरसेवकांनी केली असता वेळेवर सभेत टिप्पणी दिल्याचे कळते.
त्यावेळी सुद्धा विरोधी नगरसेवक डोहे यांनी लेखी आक्षेप घेतला.परंतू नगराध्यक्षा व सत्ताधारी नगरसेवक,यांचे दारू व्यवसायिकासोबत संगनमत असल्याने विरोधकांच्या लेखी व तोंडी आक्षेपाला तसेच त्या प्रभागातील महिलांच्या आक्षेपाला बगल देत सत्ताधाऱ्यांनी सदर ठराव एकमताने मंजूर केला असे म्हणत त्यावेळी भाजप व शिवसेना नगरसेवकांनी याचा कडाडून विरोध केला अशी माहिती देत सत्ताधाऱ्यांनी ठराव जरी मंजूर केला असला तरी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असे या नगरसेवकांनी म्हटले आहे.आता जर अपील केली तर हा ना-हरकत ठराव हरकतीचे ठरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेना गटनेता सागर ठाकुरवार, सरवर भाई,सौ.रजी़या शेख खाजा हे तीन नगरसेवक अनुपस्थीत होते. तर भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे,भाजपचे नगरसेवक रामसेवक मोरे,शिवसेनेच्या सौ.गोरे,सौ.कोडापे व सौ.अहीरकर हे नगरसेविक सभेत उपस्थीत होत्या. सभेनंतर सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून असे वाटत होते की,जणू यांनी एखादा फार मोठा विकासात्मक ठराव घेतला की काय ! अशी उपहासात्मक टीका विरोधी नगरसेवकांनी केली आहे. काही का असेना पण मद्यप्रेमींच्या सेवेत पुन्हा एक दारू दुकान लवकरच हजर होणार आहे हे मात्र विशेष.