मूल (गुरू गुरनुले) गुरे चारण्यास गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील टेकाडी येथे घडल्याने परीसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सुरू असलेल्या शेतीच्या हंगामात शेतीवर जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा हल्ले होवु नये म्हणुन वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे. टेकाडी येथील ७० वर्षीय घाटू वळगु भोयर हा नेहमीप्रमाणे काल गुरे चारण्या करीता गांवालगतच्या मामा तलावा जवळील जंगल परिसरात गेला होता. गुरे चरत असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने घाटु भोयर याचेवर हल्ला करून ठार केले. काल सायंकाळी गुरे घरी परत आले परंतु गुरांसोबत घाटू भोयर घरी परत न आल्याने कुटूंबियांना संशय आला. काल संध्याकाळीच ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगल परिसरात शोधाशोध केली परंतु घाटू भोयर कोठेही आढळुन आले नाही. म्हणुन पुन्हा आज सकाळी शोध मोहीम सुरू केली तेव्हा सादागड बिटातील कक्ष क्रमांक ३०५ येथे घाटू भोयर याचा मृतदेह झुडपा लागत आढळून आला. सदर माहिती वन विभागाला कळविल्या नंतर सावली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वसंतराव कामडी यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. सदर घटनेची माहीती होताच पोलीस स्टेशन मूलचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचुन पंचनामा केला. शवविच्छेदना नंतर मृतक घाटुचे पार्थीव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. मृतक घाटु भोयरच्या कुटूंबियांना वन विभागाच्या वतीने वनपरीक्षेञ अधिकारी वसंतराव कामडी यांनी तातडीची मदत म्हणुन २५ हजार रुपये दिले. यावेळी क्षेत्र सहाय्यक विनोद धुर्वे, वनरक्षक रूपेश बैनलवार, सरपंच सतिश चौधरी,पोलीस पाटील प्रमोद बोमनवार, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पोटवार, बंडु गोहणे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी जंगली प्राण्यांपासुन जीवहानी होवु नये म्हणुन गुरे चारण्यासाठी शासनाने कुरण उपलब्ध करून द्यावा आणि वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.