चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकटात यावर्षी गेल्या विस वर्षात सर्वाधीक शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब शासनाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. गेल्या वर्षभरात जवळपास ६९ शेतकर्यांनी आपले जीवन संपविले असून यावर्षी वर्षभराचा आकडा या सहा महिन्यातच गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल ५२ शेतकर्यांनी नापिकी, कर्जबाजारी अशा संकटामुळे आत्महत्या केली आहे. अजून सहा महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने यावर्षी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दुपटीने वाढण्याची भीती नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या समस्यांकडे शासनाने अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह औद्योगीक जिल्हा असूनही येथील जनतेची अवस्था बकाल झाली आहे. शेकडो उद्योग केवळ येथील साधन संपत्तीचे शोषण करुन मालामाल होत आहे. तर दुसरीकडे येथील शेतकरी दिवसेंदिवस नापीकी व कर्जबाजारीच्या विळख्यात अडकून आत्महत्येला कवटाळत आहे. गेल्या दिड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. आधीच आर्थीक हलाखीत पिचलेला शेतकरी वर्ग कोरोना संकटाचा सामना करताना हतबल झाला असल्याने थेट मृत्यूला कवटाळत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी २०२० मध्ये ६९ शेतकर्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ जणांच्या कुटूंबांना पात्र ठरवल्याने प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली. यातील २९ जण अपात्र ठरले, तर एक प्रकरण फेरचौैकशीमुळे प्रलंबीत आहे. यावर्षी म्हणजे २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात १२ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यातील ८ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून २ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. फेरचौकशीसाठी १ प्रकरण प्रलंबीत आहे. पात्र शेतकर्यांच्या कुटूंबीयांना ८ लाखांची मदत देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ५ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४ प्रकरणे पात्र ठरली, तर १ प्रकरण अपात्र ठरले आहे. पात्र कुटूंबीयांना ४ लाखांची मदत करण्यात आली. मार्च महिन्यात ११ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४ प्रकरणे पात्र, तर ३ प्रकरणे अपात्र ठरली. १ प्रकरण फेरचौकशीसाठी प्रलंबीत असून ३ प्रकरणे कार्यवाहीकरीता प्रलंबीत आहेत. यातील पात्र कुटूंबांना ३ लाखांची मदत करण्यात आली. एप्रिल महिन्यात १२ शेतकर्यांनी आत्महत्या केली. यातील २ प्रकरणे पात्र, तर २ अपात्र आहे. ३ प्रकरणे कार्यवाहीकरीता प्रलंबीत आहेत. पात्र कुटूंबांना २ लाखांची मदत करण्यात आली आहे. मे महिन्यात ५ शेतकर्यांनी आत्महत्या केली. यातील २ प्रकरणे अपात्र, तर ३ प्रकरणे कार्यवाहीकरीता प्रलंबीत आहेत. जून महिन्यात ७ शेतकर्यांनी आत्महत्या केली. ही सर्व प्रकरणे कार्यवाहीकरीता प्रलंबीत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहता शेतकर्यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी सरकारने जशी आत्मीयता दाखवली, तशीच तळमळ शेतकरी प्रश्नांवर दाखवली तर शेतकऱ्यांचेही भले होईल.