अहेरी - "जियेंगे साथ और मरेंगे भी साथ" अहेरी येथील वेलगुर गावातील कोटरंगे दाम्पत्याचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आले.
मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
मध्यम वयातील मजूरवर्गीय दांपत्याने राहत्या घरातच रहस्यमय रीत्या आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. अहेरी तालुक्यातील वेलगूर येथे ही घटना घडली. जनार्दन कोटरंगी (५० वर्ष) आणि पोचूबाई कोटरंगे (४८ वर्ष) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
दोघेही मजुरी करत होते. त्यांचा मुलगा देवानंद आठ दिवसांपूर्वी आपल्या सासरी मचलीटोला येथे गेला होता. त्याची पत्नी माहेरीच होती. शुक्रवारी सकाळी ७ वाजता तो घरी आला असता त्याला दुर्गंधी येऊ लागली. दार आतून बंद होते. त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता वडील जनार्दन यांचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला, तर आई पोचूबाई जमिनीवर पडून होती.
माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दुपारपर्यंत घटनास्थळावर पंचनामा सुरू होता. मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू तीन ते चार दिवसांआधीच झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती मिळणार असून पुढील तपास सुरू आहे.