यवतमाळ - 25 एप्रिल ला मांगुर्ला जवळ कम्पार्टमेंट क्रमांक 30 मध्ये गर्भवती वाघिणीला जिवंत जाळले होते, त्यानंतर त्या वाघिणीचे दोन्ही पंजे कापण्यात आले, अमानुष व क्रूर पद्धतीच्या या गुन्ह्यात संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, मात्र वनविभागाने तपास सुरू ठेवत आरोपींना अटक केली.
जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली. नागोराव टेकाम, सोनू टेकाम, गोली टेकाम, बोनू टेकाम, तुकाराम टेकाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी वरपोड येथील रहिवाशी आहेत.
याआधी या प्रकरणी दुभाटी गाव येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मांगुर्ला येथे वाघिणीच्या क्रूरपणे हत्या केल्याच्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या वाघिणीची हत्या इतकी निर्घृण होती की हत्या करणाऱ्यांनी गुहे समोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते.
आरोपींना अटक करताना वन विभागाचा मोठा फौजफाटा घेऊन ताफा मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास वरपोड या गावी पोहोचला. तिथे कोम्बिंग ऑपरेशन रावबत पथकाने सर्व आरोपींना अटक केली.