नागपूर - कोरोनाच्या काळात डॉक्टरांची कमतरता आहे, याचा गैरफायदा घेत बोगस डॉक्टर आपली संधी साधून घेत असल्याचं चित्र आहे. अशाच बारावी पास बोगस डॉक्टरला नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरातून अटक करण्यात आली आहे. चंदन चौधरी असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे.
नॅचरोपॅथीचं शिक्षण घेतलेला चंदन चौधरी नावाचा बोगस डॉक्टर इंटरनेटवर पाहून रुग्णांवर उपचार करायचा. पुस्तकं पाहून औषधं द्यायचा.
अनेक कोरोनाबाधीत रुग्णांवर याने उपचार केले आहेत. काही कोरोनाबाधीतांचा मृत्यूही झाला आहे.
धक्कादायक म्हणजे प्रेमी युगुलांचा अवैध गर्भपात करण्याचे काम हा बोगस डॉक्टर दुप्पट पैसे घेऊन करायचा. याशिवाय तरुणी-महिलांना नर्सिंगचं प्रशिक्षणंही द्यायचा. कामठी पोलिसांनी सैलाबपुरा परिसरात छापा टाकून त्याला अटक केली आहे.
चंदन चौधरीने नागपुरात आपला पसारा मांडला होता. केवळ 12 वी पास असलेल्या या बोगस डॉक्टरने येईल त्या रुग्णाला औषध देण्याचं काम केलं. हा बहाद्दर इंटरनेटवरुन माहिती मिळवायचा. एखादा रुग्ण दवाखान्यात आला की त्यावरचं औषध तो इंटरनेवर सर्च करायचा, सर्च केलेलं औषध रुग्णांना लिहून द्यायचा. इतकंच नाही तर पुस्तकं वाचून त्याने अनेकांना औषधं दिली होती.
धक्कादायक म्हणजे हा डॉक्टर प्रेमी युगुलांना टार्गेट करत होता. जास्त पैसे उकळून अवैधरित्या गर्भपात केल्याचे अनेक प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.