वरोरा - राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्याने कडक निर्बंधांसाहित संचारबंदी घोषित केली आहे, जिल्हाबाहेर प्रवास करायचा असल्यास वाहनचालकांना कारण असतांना प्रवासाची परवानगी मिळत आहे.
असे असतांना सुद्धा अवैध दारू तस्करी मात्र अजूनही सुरूच आहे, कधी नागपूर तर कधी वर्धा मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू येत आहे.
या अवैध दारू तस्करांना विशेष सूट आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरोरा तालुक्यात काही दिवसांपूर्वी पोलीस शिपायाने पहाटे ला तब्बल 18 लाखांची अवैध दारू पकडली, मात्र ती दारू त्याने का पकडली म्हणून पोलीस निरीक्षकांनी त्याला चांगलेच धारेवर धरले होते.
पुन्हा वरोऱ्यात पोलिसांनी 15 लाखांच्या दारू सहित तब्बल 29 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
28 एप्रिलला अवैध दारू वाहतुकीची गुप्त माहिती वरोरा पोलिसांना प्राप्त झाली, सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी खांबाडा चेकपोस्टवर नाकाबंदी केली, त्यावेळी अशोक लिलेंड कम्पनीचे चारचाकी वाहन पोलिसांनी थांबविले व चौकशी सुरू केली असता वाहन क्रमांक एमएच 49 एटी 2704 मध्ये अवैध दारूचा साठा आढळून आला.
सदर मालवाहतूक करणाऱ्या गाडीसमोर दारूची तस्करी सुखरूप व्हावी यासाठी हुंडाई कार क्रमांक एमएच 49 बिके 3035 पेट्रोलिंग करीत होती.
पोलिसांनी तात्काळ अवैध दारू सहित आरोपी निलेश सुखदेव सेलोटे, राहील सलीमखा पठाण, शेख जुबेर शेख, रणजित चंद्रमनी मेश्राम, सर्व राहणार नागपूर यांना अटक करण्यात आली.
सदरची कारवाई सपोनि किटे, बेलसरे, प्रदीप पाटील, सूरज व कपिल या पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

