ताजी बातमी - देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून कामगार आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा अभिनेता सोनू सूद आताही आपल्या मदतीचं काम करतो आहे. स्वतः कोरोनाने बाधित झालेला असतानाही त्याने देशभरातील शेकडो लोकांची मदत केल्याने अनेक लोक त्याच्या कामाला सलाम करत आहेत. सोनू सूदच्या मदतीच्या सातत्याने अनेकजण अवाक झालेत. आताही असाच अनुभव आलाय. नागपूरमधील एका तरुणीने वडिलांना कोरोना संसर्ग झाल्याचं सांगत व्हेंटिलेटर मिळत नसल्याची अडचण सांगितली आणि सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली. यावर सोनू सूद यांनी तात्काळ तिला आधार देत मदतीचं आश्वासन दिलं.
नागपूरच्या रोशनी बुराडे या तरुणीने ट्विट केलं, 'माझे पप्पा कोरोना बाधित आहेत. त्यांना व्हेंटिलेटरची खूप गरज आहे. संपूर्ण नागपूरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीये. सोनू सूद सर मला कृपया मदत करा. माझ्या पप्पांना वाचवा प्लिज. तुम्हीच मला मदत करु शकता.' यावर सोनू सूदने तात्काळ प्रतिसाद देत तुझ्या वडिलांना काहीही होणार नाही. एका तासात त्यांना व्हेंटिलेटर मिळेल असं ट्विट केलं.'
मागील वर्षभरापेक्षा अधिक काळात सोनू सूदने हजारो लोकांना मदत केलीय. दररोज शेकडो लोक सोनू सूद यांच्याकडे मदतीची मागणी करतात. त्यावर सोनू सूद आपल्या क्षमतेप्रमाणे या सर्वांना मदत करतात असतात.