बल्लारपूर - बल्लारपूर शहर तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता बल्लारपूर शहरात ५० बेडेड डी.सी.एच.सी. अर्थात डेझीग्नेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारण्याची तसेच १५० बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा आणि मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचेशी याबाबत चर्चा केली व नगर परिषदेने यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश दिले.
वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता बल्लारपूर येथे ५० बेडेड डी.सी.एच.सी. अर्थात डेझीग्नेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारणे गरजेचे आहे. त्यामध्ये 40 ऑक्सीजन बेडस् असावेत, याकरिता लागणार ऑक्सीजनचा पुरवठा नियमित राहण्याकरिता डी.सी.एच.सी. रूग्णालयाच्या ठिकाणी एक ऑक्सीजन प्लॅंन्ट उभारण्यात यावा असे आ. मुनगंटीवार यांनी निर्देशित केले. सदर डी.सी.एच.सी. रूग्णालयातील वैदयकीय सेवेकरिता जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रूग्णालय चंद्रपूर तथा बल्लारपूर पेपर मिल येथील वैदयकीय अधिका-यांच्या सेवा घेवून कोरोना रूग्णांच्या सेवेत सदर रूग्णालय तात्काळ कार्यान्वित करावे असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे बल्लारपूर शहरानजिक जे क्रिडा संकुल उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी 150 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय या चर्चे दरम्यान झाला. यासंबंधीचा प्रस्ताव त्वरीत जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिका-यांना दिले.
आज घडीला बल्लारपूर तालुक्यात 580 अॅक्टीव्ह रूग्ण असुन ही संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता बल्लारपूर येथे डी.सी.एच.सी. रूग्णालय त्वरीत उभारण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचेकडे केली आहे.