चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल सर्वाधिक 937 रुग्ण आढळून आले. आजवरची ही सर्वाधिक संख्या आहे. वाढणारी रुग्ण संख्या आणि उपलब्ध व्यवस्था याचा ताळमेळ बसणं आता कठीण झालं आहे. आजघडीला एकाही रूग्णालयात बेड उपलब्ध नाही. जिल्ह्यात एकूण 1870 बेड्स आहेत. यातील सगळेच भरले आहेत. त्यामुळं गंभीर रुग्णांची व्यवस्था कुठं करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात 5278 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ही भयावह स्थिती पाहता प्रशासनानं आता हालचाली करायला सुरूवात केली आहे. त्यात महिला रुग्णालयात 100 बेड्स आणि चांदा क्लब मैदानावर 500 बेड्सचं जम्बो रुग्णालय स्थापन करण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. यातील महिला रुग्णालयात 100 बेड्सची घोषणा सहा महिन्यांपूर्वीच केली गेली. मात्र आजाराने उसंत घेतल्यावर हे काम थंडबसत्यात गेलं. आता परिस्थिती बिकट झाल्यावर प्रशासनाला पुन्हा जाग आली. ही अनास्थाच रुग्णांच्या जीवावर उठल्याचं दिसून येत आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा प्रशासनाची बैठक होणार असून चांदा क्लब ग्राउंडवर 500 बेडच्या जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
GFX
- कोविड केअर सेंटर : 9
- कोविड हेल्थ केअर सेंटर : 12
- कोविड केअर सेंटर (व्हेंटिलेटर-ऑक्सिजनसह) - 9
- एकूण बेड्स - 1870
- रिक्त बेड्स : 00
- आणखी गरज - 2500 बेड्सची
- प्रस्तावित बेड्स - 600 (किमान आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित)