चंद्रपूर - कुमार सानू हा चित्रपट सृष्टीमधील नावाजलेला गायक नसून चंद्रपूर शहरातील चोरी करण्यात निपुण असलेला आरोपी आहे.
रामनगर पोलिसांनी विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. यात विधिसंघर्ष ग्रस्त बालकासह कुमार सानू या आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी बाबुपेठ येथील डॉ आंबेडकर नगरात घरफोडी ची घटना उघडकीस आली होती. उराडे परिवार लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधत चोरटयांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून रोख रकमेसह सोने व चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. तसेच दुचाकी सुद्धा चोरून नेली होती.त्या दिशेने रामनगर पोलिसांनी तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे विधिसंघर्ष ग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता त्याने बाबुपेठ परिसरातील ऋषिदेव उराडे यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच या घटनेत कुमार सानू या आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने शहर पोलीस स्टेशन व भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विधिसंघर्ष ग्रस्त बालक हा ३ दिवसापूर्वी बालसुधारगृहातून पसार झाला होता. त्यांनतर त्याने कुमार सानू याच्या मदतीने अनेक घरफोड्या,दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.पोलिसांनी सोन्याचांदीचे दागिने,मोबाईल, दुचाकी, रोख रखमेसह ३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मलिक,एकरे,रजनीकांत पुठ्ठावार,प्रशांत शेंद्रे आदींनी केली आहे.
