चंद्रपूर - जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यावर अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावू लागले आहे, यामध्ये नाममात्र वेळेसाठी तर काही अविरतपणे अवैध धंदे सुरू आहे.
असाच एक धंदा मागील 12 वर्षांपासून अविरतपणे सुरूच आहे, तो आहे दुर्गापुरातील सट्टापट्टीच्या महाराजांचा धंदा, होय मागील 12 वर्षापासून महाराज या धंद्यात अजूनही टिकून आहे.
वणी नंतर दुर्गापुरातील महाराजांच्या धंद्यांचा क्रमांक लागतो.
मूळचे राजस्थान राज्यातील हे महाराज दुर्गापुरात येऊन यांनी छोटं हॉटेल सुरू केले, हळूहळू हे हॉटेल चांगल्या पद्धतीने महाराजांनी सांभाळले, मात्र पैश्याची असलेली हौस महाराजांना सट्याच्या धंद्यात घेऊन आली.
दररोज 1 ते दीड लाखांची उलाढाल यामध्ये सुरू आहे, ते सुद्धा पोलीस स्टेशनच्या अवघ्या दीडशे मीटर हाकेच्या अंतरावर, आजही यावर कसल्या प्रकारची कारवाही झाली नसून, महाराज यांचा आत्मविश्वास अजून बळावला आहे.
कल्याण, राजधानी व मिलन हे या सट्टा व्यवसायाचे प्रमुख स्रोत.
दररोज दुपारी 3 वाजता या हॉटेलात सट्टाप्रेमींची गर्दी जमायला लागते, हळूहळू चिठया सर्वाना आपल्या आवडीचा ओपन आकडा लिहायला सांगतात, हे चालत सायंकाळी 6 वाजेपर्यंत रात्री 8 वाजता सुरू होते नेट ची तयारी म्हणजे सट्ट्याच्या मुख्य गेम, ज्याला लागला तो किंग अशी ओळख या धंद्यातील महाराजांची आहे.
महाराजांचे या धंद्यावर प्रेम करणारे व सट्टा लावणारे वेकोली, महाऔष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत राहणारे काही नागरिक तसेच चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन सारख्या उच्चभ्रू वस्तीत राहणारे.
महाराज यांचा ह्या धंद्यात आत्मविश्वास अति वाढला आहे कारण पोलिसांचे त्यांना भय नाही, कुणाचा आशीर्वाद आहे ह्यांच्या या सट्टा व्यापाराला? हे पोलिसांना नक्कीच ठाऊक असेल. विशेष म्हणजे दुर्गापूर डीबी पथक या महाराजांना चांगल्या पद्धतीने ओळखतात.
मात्र आता चित्र वेगळे असून चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेत बेधडक कारवाई करणारे बाळासाहेब खाडे हे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहे, सोबतच चिमूर वरून आलेले दुर्गापूर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, महाराजांच्या सट्टा व्यापारावर हे दोन कर्तव्यदक्ष अधिकारी कारवाई करून नक्कीच आपलं कर्तव्य बजावणार.
सट्टाप्रेमींचे वाहन रस्त्यावर असल्याने नागरिकांना याचा मोठा फटका बसतो, रस्त्यावर वाहने उभे असल्याने या मार्गावर अनेक अपघात झाले असून काही दिवसांपूर्वी एकाचा मृत्यू सुद्धा या मार्गावर झाला होता.
या सट्टा व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखा की दुर्गापुर पोलीस प्रथम कारवाई करेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
