गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
   गडचांदूर शहरात माणिकगड सिमेंट कंपनीच्या बाजूला अस्तित्वात असलेले बंगाली कॅम्पचे रहिवासी मागील ३५ ते ४० वर्षांपासून वीज,पाणी व इतर मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. कित्येकदा निवडणुका झाल्या.मतांसाठी बरेचशे लोकप्रतिनिधी यांच्याकडे आले.व्यथा जाणून घेत समस्या मार्गी लावण्यासाठी आश्वासने दिली नंतर याकडे दुर्लक्ष केले. येथील त्रस्त नागरिकांनी अनेकदा संबंधितांकडे पत्रव्यवहार केले ही मंडळी बलाढ्य कंपनीपुढे हतबल असल्याने समस्यांचे निवारण काही झाले नाही.यामुळे सदर कॅम्पवासीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.दरम्यान मागील एक वर्षांपासून प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांनी याकडे जातीने लक्ष घालून या नागरिकांना स्वाभिमानाचे जीवन जगता यावे,यांना मुलभुत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले.सतत शासकीय स्तरावरील पाठपुराव्या नंतर हल्ली प्रयत्नांना यश प्राप्त होत असून ४० वर्षांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कॅम्पवासीयांसाठी दोन दिवसांपुर्वीच याठिकाणी नळ कनेक्शन उपलब्ध करून दिले.एकच बोअरवेल द्वारे पाणी घेत असलेल्या १०० पेक्षा जास्त लोकांना नळाचे पाणी उपलब्ध झाल्याने उत्साहाचे वातावरण पसरले होते.
      मात्र यांना सतत नरकयातनाच भोगावी लागणार की काय ? असे चित्र असून कॅम्पच्या बाजूला असलेल्या सिमेंट कंपनीच्या एका सिक्युरिटीने याठिकाणी अचानकपणे धडक देऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स्थानिक नगरपरिषदेने लावलेल्या नळाची बळजबरीने तोडफोड करून पोबारा केला.अशी माहिती कॅम्पवासीयांनी दिली आहे.एकिकडे दरवर्षी मोठ्या थाटामाटात "पाणी दिवस" साजरा केला जातो तर दुसरीकडे याठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. "अखेर किती दिवस भोगायची नरकयातना" असा प्रश्न कॅम्पवासी उपस्थित करीत असून नळ तोडफोड संबंधीची तक्रार पोलीस स्टेशन व संबंधीतांकडे करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच News34 प्रतिनिधींनी भेट दिली असता कॅम्पवासीयांनी अशाप्रकारे व्यथा मांडली.
