चंद्रपूर - वेकोलीत स्थानिक युवकांना रोजगार द्या या मागणीकरीता सोमवारी १५ फेब्रुवारीला आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यासह हजारो युवक सहभागी झाले.
चंद्रपूरात सर्वत्र वेकोलीची जाळे पसरले आहे. याचा मोठा दुष्परिणामही प्रदुषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले तरी या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिल्या जात नाही. परिणामी उद्योग असूनही येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामूळे वेकोली अंतर्गत चालणा-या विविध कंपण्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या प्रमूख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गांधी चौकाजवळून सुरु झाला त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
आमदार जोरगेवार यांनी यावेळी स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली, आज सर्वत्र जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार झाला असून बाहेरच्या परप्रांतीय कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात येत आहे, वेकोलीत खाजगी तत्वावर काम करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांकडे लक्ष देत रोजगार द्यावा अन्यथा सर्व कंपन्यांचे काम बंद पाडू असा इशारा आमदार जोरगेवारांनी दिला.
