गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे २९ जानेवारी २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास महिलांनी चिकन,मटण मार्केटमधील अवैध दारू पकडून दिली होती.नंतर दारूविक्रेतांनी कोरपना राकाँ महिला तालुकाध्यक्षा सौ.रितीका ढवस यांच्या घरावर हल्ला केला.ढवस परिवाराच्या बचावासाठी आलेले जि.प.सदस्य शिवचंद्र काळे यांनाही मारहाण झाली.नंतर अंदाजे ३ तास रस्ता रोको आंदोलन झाले."जोपर्यंत अवैध दारूविक्री,सट्टापट्टी कायमची बंद करण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही" अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.मग उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी घटनास्थळ गाठून अवैध व्यवसायीकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.नंतर रस्ता खुला करण्यात आला.
यासर्व घडामोडी नंतर राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके,दिपक जैस्वाल,तालुकाध्यक्ष सौ. ढवस यांनी इतर सहकाऱ्यांसह गडचांदूर पोलीस स्टेशन गाठून सदर प्रकरणी तक्रार दिली.यानंतर पत्रकारांपुढे बोलताना जिल्हाध्यक्ष वैद्य व महिला जिल्हाध्यक्षा उईके यांनी स्थानिक पोलीस प्रशासनावर सडकून टीका केली.ठाणेदाराची जिल्हा बाहेर बदली करण्याची मागणी थेट गृहमंत्री ना.अनील देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे वैद्य आणि उईकेताई यांनी म्हटले होते.यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हे गडचांदूरला आले असता सौ.ढवस यांनी काही महिलांसह त्यांची भेट घेऊन चर्चा केली.फक्त महिलांनाच पोलीस अधीक्षकांना भेटण्याची संधी देण्यात आल्याने पुरूष नेत्यांमध्ये नाराजी होती.पोलीस अधीक्षकांना भेटुन महिला बाहेर आल्या तेव्हा तालुका महिला अध्यक्षा सौ.ढवस यांनी माहिती दिली की, येत्या १५ दिवसात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.जरका १५ दिवसात सर्व अवैध धंदे बंद न झाले तर तालुका महिलांसह आंदोलन करू असे सौ.ढवस म्हणाले होते.तसेच राजूरा राकाँ विधानसभा प्रमुख अरूण निमजे यांनी येत्या आठ दिवसांत जर सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास एसडीपीओ कार्यालय नांदाफाटा व गडचांदूर पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. #News34Chandrapur
उल्लेखनीय म्हणजे यागोष्टीला १० ते १४ दिवसांचा कालावधी लोटत आहे.अवैध धंदे बंद होण्या ऐवजी यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.ठाणेदाराची बदली झालेली नाही.अवैध धंदे बंद करण्याऐवजी चार दिवसापुर्वी पुन्हा गडचांदूर शहरात तीन पार्टनर असलेल्यांना सट्टा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याची चर्चा आहे.राकाँ नेत्यांनी दिलेल्या मुदतीत अवैध धंदे बंद काही झालेच नाही आणि ठाणेदाराची बदलीही झाली नाही हे मात्र विशेष.राज्याचे गृहमंत्री राकाँचे असतानाही जिल्हा नेत्यावर अशी पाळी यावी हीच मोठी शोकांतिका.काही का असेना मात्र या प्रकरणी जिल्ह्यातील राकाँ नेत्यांचा "बार फुसका" ठरल्याची तसेच या नेत्यांवर गडचांदूर ठाणेदार वरचढ ठरल्याची उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
