चंद्रपूर - महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत जरी पन्नास टक्के आरक्षण असलं तरी अजूनही विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य गटातूनच महिलांना निवडणूक लढवावी लागते. हे अजूनही भारतासारख्या मोठ्या आणि सत्तर वर्ष जुन्या लोकशाही देशात तेवढं सोप्प नाही. महिलांना उमेदवारी मिळवण्यापासून तर निवडणूक जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळेच अजूनही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात देखील विधानसभेत अजूनही महिला आमदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के महिला आहेत अस सूत्र वापरल्यास हे प्रमाण तसे कमी असले तरी आजही महिला निवडणुकीत उभ्या राहून आपली दावेदरी सिद्ध करत आहेत. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने अशीच पहिली महिला आमदार वरोरा मतदारसंघाला मिळाली.
(Happy Birthday Mla Pratibha Dhanorkar Congress)
सतत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या मतदारसंघात त्यामुळेच ऐतिहासिक परिवर्तन झाले. पहिल्यांदा आमदार बनलेल्या प्रतिभा धानोरकर यांच्या समोर अनेक आव्हाने उभी होती पण आपल्या कर्तव्यदक्ष, आणि मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी ती आव्हाने पूर्ण केली आणि बघता बघता घर सांभाळणारी ही गृहिणी एक सक्षम आमदार बनली. बालपण खेड्यात गेल्याने ग्रामीण संस्कृती शी नाळ त्यांच्याशी जोडली असल्याने ग्रामीण भागातील महिलांनी त्यांना भरभरून प्रेम दिले, पाठिंबा दिला.
आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात प्रतिभा धानोरकर यांनी अनेक प्रश्न लावून धरले. मतदारसंघातील नागरीकांचे प्रश्न त्यांनी विधानसभेत आणि शासन दरबारी लावून धरले. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष आत्मीयता त्यांच्या मनात आहे. दरवर्षी विविध बियाने उत्पादन करणाऱ्या कंपन्या बोगस बियाणे शेतकऱ्यांना वितरित करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होते. अशा बियाणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका त्यांनी विधानसभेत घेतली त्याचाच परीणाम म्हणून संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बियाने वितरित करण्यात आले.
अनेक शासकीय व बिगर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनींग या शाखेमध्ये मुलींना प्रवेश नव्हता. आज एकविसाव्या शतकात वाटचाल करत असतांना स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी आपण करतो तर मायनींग सारख्या अभियांत्रिकी शाखेत प्रवेश का मिळू नये?? अशी भूमिका घेऊन त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा केला, परीणामी नव्या शैक्षणिक सत्रापासून मुलींना मायनींग सारख्या पुरुषप्रधान असलेल्या शाखेत प्रवेश मिळणार आहे. नुकताच महाराष्ट्रात शक्ती कायदा स्थापन झाला, त्या साठीची मागणी देखील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत केली होती. विधानसभेत महिला दिनाला महिला आमदारांना बोलण्यासाठी विशेष वेळ देण्यात आला होता तेव्हा आमदार धानोरकर यांनी वेगळ्या शैलीत आपले भाषण करून सभागृहात छाप टाकली.
आगामी काळात बचत गटाच्या माध्यमातून गृहउद्योग करणाऱ्या महिलांसाठी मॉल उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे महिलांच्या गृह उद्योगांना आधुनिक स्वरूप प्राप्त होणार आहे.तृतीय पंथीय देखील समाजाचा घटक आहेत, त्यांना मुख्यप्रवाहात आणले गेले पाहिजे, त्यांना देखील मानाने जगता आले पाहिजे यासाठी शासकीय नौकरीत दोन टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरत्या काळात त्यांना आमच्या प्रदेश महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा हि जबाबदारी देखील मिळाली आहे. आगामी काळात महिला सक्षमीकरण आणि महिला संघटन बांधणीसाठी एकत्र काम करून महिला मजबूत करण्याचा आमचा मानस आहे.अशाप्रकारे समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी मागच्या एका वर्षात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रयत्न केले आहेत.
प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने पुर्व विदर्भात महिलांचे एक नवीन नेतृत्व उदयाला आले आहे. आज आमदार प्रतिभा वहिनी धानोरकर यांचा वाढदिवस आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच आमदार म्हणून त्यांनी एक वर्षाचा आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला त्या साठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या हातून समजातील सर्व घटकांची सेवा अशीच घडत राहो आणि त्यांना उत्तरोत्तर यश मिळू दे हिच सदिच्छा.
नम्रता ठेमस्कर, महाराष्ट्र महिला प्रदेश कांग्रेस सचिव
