भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळं गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
अवघ्या काही महिन्यांच्या आणि एक वर्ष होण्यासाठी काही दिवस शिल्लक असणाऱ्या बालकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं कळत आहे. आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे वृत्त कळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या मातांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं. (Bhandara Hospital Fire)
चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातांची आणि नातेवाईकांची झालेली अवस्था मन हेलावणारी आहे. दरम्यान, अनेक नेतेमंडळी आणि स्थानिक नेतेमंडळींनी या घटनास्थळाचा आढावा घेतला. स्थानिक आमदारांनी घटनास्थळी भेट देत या बेजबाबदारपणासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.
