नागपूर - लग्न टाळण्यासाठी प्रेयसीने अजब अट ठेवल्याने तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून 28 वर्षीय रोशन भास्कर खिरे अश्या मृत प्रियकराचे नाव आहे.
किरण नावाच्या मुलीसोबत मृतक रोशनचे प्रेमसंबंध होते, दोघेही एका दुकानात काम करीत असल्याने दोघांची जवळीक वाढली होती.
किरणच्या पतीचे निधन झाले होते व तिला 2 मुले असल्याने ती लग्न टाळत होती.
किरण वारंवार रोशनला समजावीत होती मात्र रोशन नेहमीच लग्नाचा विषय काढत आल्याने किरणने त्याला लग्न करायचे असेल तर मला 2 लाख रुपये द्यावे लागतील अशी अट किरणने रोशनसमोर ठेवली.
किरणची ही अट रोशनच्या जिव्हारी लागली इतके पैसे नव्हते, जमवायचे झाल्यास तर आणायचे कुठून अशी चिंता रोशनला भेडसावत होती.
किरणवर असलेलं जीवापाड प्रेम व तिच्यापासून दूर होण्याची भीती रोशनला सतवायला लागली अखेर त्याने स्वतःला संपवायचा निर्णय घेत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र उपचारादरम्यान रोशनचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी रोशनने सुसाईड नोट लिहले असल्याने पोलिसांनी त्या नोट च्या आधारे तिघांवर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
