गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात 35 हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेले शहर गडचांदूरात विराजमान माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वायुप्रदुषण,ध्वनीप्रदुषण ही समस्या तर नेहमीचीच बनली आहे.मात्र आता परराज्यातून याठिकाणी येणारे लोंढेच्या लोंढे कोविड सारख्या घटनेत वाढ करायला पुरेसे ठरत आहे.कोरोनाच्या संकटात सध्याच्या परिस्थितीत सर्दी,खोकला यासारखे आजार पसरले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळांनी यापूर्वी अनामत रक्कम जप्त केल्याची माहिती असून तरीपण माणिकगड सिमेंट कंपनीची मनमानी व मुजोरीत काहीच फरक पडलेला दिसत नाही.डस्टची समस्या नागरिकांच्या जिव्हारी लागली असून नवनवीन आजार डोके वर काढत आहे.दमा,अस्थमा यासह सकाळी घरांमध्ये कणीयुक्त धुराचा खच साचत आहे.माणिकगड सिमेंट कंपनीच्या या कृत्याबद्दल अनेक तक्रारी करूनही चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.प्रदुषणाची समस्या लवकर मार्गी न लागल्यास संघटितपणे आंदोलन उभारण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे.
नुकतेच एका शिष्टमंडळाद्वारे महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांची भेट घेऊन सदर प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.शहरात माणिकगड सिमेंट कंपनी नियमांचे पालन करत नाही,रात्रीच्या सुमारास धूर सोडल्या जातो,परिसरातील शेत पिक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो,नागरिक देखील अनेक आजाराने ग्रासले आहे,उपचाराचा खर्च वाढला,प्रदूषणामुळे लहान बालकांनाही अनेक आजारांची लागण झाली आहे.एकुणच माणिकगड सिमेंट कंपनीच्या मनमानीमुळे नागरिकांचे जिवन धोक्यात आले असून नागरिकांमध्ये कमालीचा रोष उफाळून येत आहे.यासर्व समस्या लक्षात घेऊन गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष तथा कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद जोगी हे आता "एक्शन मोडवर" आल्याचे दिसत असून तातडीने प्रदूषणावर नियंत्रण करावे,यापुढे धुरीचा परिणाम नागरिकांवर होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करू. याबाबत लवकरच एक याचिका दाखल करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष जोगी यांनी News34 ला दिलेल्या मुलाखतीत दिली असून पर्यावरण मंत्र्यांना निवेदन पाठवून यासंबंधी चौकशीची मागणी सुद्धा केल्याची माहिती देण्यात आली आहे.
