निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आम्ही लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. चोरबाजाराला मान्यता मिळणार असेल तर बाकीच्या बाजारांना अर्थ नाही. Central Election Commission
शिवसैनिकांनो खचू नको, मी खचलो नाही. ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागेल. विजय आपलाच होईल. मैदानात उतरलो आहे आता विजयाशिवाय माघारी परतायचे नाही. नामर्दांना चोरी पचली वाटत असेल पण ती पचणार नाही. जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. Symbol bow and arrow
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव सुरु असताना आता देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून लोकशाही संपवून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याची घोषित करावं. देशातील लोकशाही संपली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाली असं बोलण्याचं धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवावं असं आव्हान त्यांनी दिले आहे. Eknath shinde cm
ही लढाई गेल्या ६ महिन्यापासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये अशी आमची भूमिका होती. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्ष कुणाचा हे ठरत नाही. धनाढ्य माणूस लोकप्रतिनिधींना विकत घेऊन पक्षावर वर्चस्व निर्माण करू शकतो. जसे न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तसे निवडणूक अधिकारी प्रक्रिया नेमण्याची गरज आहे. आज जी दयनीय अवस्था शिंदे गट आणि भाजपाची झालीय त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. महापालिकेपासून सर्व निवडणुका एकत्र घ्या. कदाचित महिनाभरात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या हातात कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभी करायची आहे. कदाचित उद्या मशाल चिन्हावरही दावा करतील. आता मशाल पेटली आहे. प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. जे धनुष्यबाण घेतले ते कागदावरचे आहे. आता शिवसेना संपली असं अनेकांना वाटत असेल. शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाण आमच्याकडे आहे. याचे तेज आणि शक्ती गद्दारांना दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
रामाकडे, रावणाकडे धनुष्यबाण होता. पण विजय रामाचा झाला. सत्याचा विजय नेहमी होत आला आहे. अन्यायाविरोधात जे पेटून उठलेत त्यांचा विजय होईल. हा अत्याचार लोकशाहीवर होतोय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, धुतराष्ट्राचा नाही. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. अपात्रतेबाबत घटनातज्ञांनुसार सदस्यांचे सदस्यत्व अपात्र होऊ शकतात. हा ठरवलेला कट आहे का? धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ओरबाडून घेऊ शकत नाही. नामर्द कितीही माजला तरी तो मर्द होत नाही अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली.