News34 chandrapur
चंद्रपूर : आदिवासी बांधवांना ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सुचनांवर आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी हे निर्णय घेतले आहेत. Tribal people in chandrapur
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम प्रारुप आराखडा 2023-24 संदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर महसूल विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चार महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या होत्या. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी या सर्व सूचना तात्काळ स्वीकारल्या. यात चंद्रपूर जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेतंर्गत घरकुले उपलब्ध करून देण्यात येतील. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकताही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विशद केली होती. त्यावरही योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले आहे.
Homes for all
जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना चंद्रपूर फ्लाईंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामधून प्लग अँड प्ले युनिटससाठी आदिवासी विभाग वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्वत:ची घरे नसणाऱ्या आदिवासी बांधवाना ‘ड’ गटाचा विचार न करता घरे बांधून देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
Cabinet minister sudhir mungantiwar
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या चारही सूचना महत्त्वपूर्ण आणि योग्य आहेत. त्यामुळे त्या सर्व स्वीकारण्यात येत असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी सांगितले. या चार महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.