News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. आपल्या देशात मतदानाचे महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे नवीन मतदारांमध्ये मतदानाचे महत्व निर्माण करण्यासाठी कृषि महाविद्यालय, मुल येथे बुधवार दिनांक २५.०१.२०२३ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून मतदार साक्षरता क्लब, कृषि महाविद्यालय, मुल आणि तहसील कार्यालय, मुल यांचा संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त तहसील कार्यालय, मुल ते कृषि महाविद्यालय, मुल येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात माननीय डॉ. रविन्द्र होळी, तहसीलदार, मुल यांनी हिरवी झेंडी दाखवून तहसील कार्यालय येथून केली. या रॅली मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त तसेच मतदानाचे महत्व याबद्दल घोषवाक्ये देऊन लोकांमध्ये विशेष करून नवीन युवकांमध्ये जागरुकता निर्माण केली. कृषि महाविद्यालय मुल येथे रॅलीचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे हे अध्यक्षस्थानी होते. मा. डॉ. रविन्द्र होळी, तहसीलदार, मुल हे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इतर उपस्थितांमध्ये मा. श्री. यशवंत पवार, नायब तहसीलदार, मुल, डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या, हे सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
सर्वप्रथम मा. तहसीलदार, मुल यांनी उपस्थित विध्यार्थी व कर्मचारी यांना मतदार पतिज्ञा दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी सांगितले की, मतदान करणे हे महत्वाचे काम आहे, त्यामुळे १८ वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची मतदार म्हणून नोंदणी आवर्जून करावी व मतदान करून आपले कर्तव्य बजवावे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी नवीन युवकांना ज्यांचे वयाची १८ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याबाबत तसेच लोकशाहीबाबत त्यांच्यामध्ये जागृकता निर्माण करावे असे आवाहन याप्रसंगी केले.
डॉ. रविन्द्र होळी, तहसीलदार, मुल यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, आपली भारतीय लोकशाही हि ईतर देशाचा तुलनेत कशी चांगली आहे. आपल्या देशात विविध संस्कृती, धर्म, पंथ असून सुद्धा केवळ आपल्या लोकशाही मुळे आपण सगळे कसे एकत्र आहोत याचे महत्व सुद्धा त्यांनी विषद केले. मा. यशवंत पवार, नायब तहसीलदार, मुल यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम ३२६ बद्दल अतिशय महत्वाची माहिती याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिली आणि मतदानाबाबत त्यांनी देशातील आणि विदेशातील इतिहास सांगितला. विद्यार्थ्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण होताच मतदार म्हणून नाव नोंदणी प्रत्येक्षरित्या अथवा भारतीय निवडणूक आयोगाचा व्होटर हेल्पलाईन (voter helpline) वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करावी व इतरांना सुद्धा याबाबत कळवावे असे सांगितले.
100% विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबद्दल
जागृकता निर्माण करण्यासाठी कृषी महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी मी नव्या युगाचा मतदार हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी मोहम्मद अल्बकय याने प्रथम तर कू.आरती महल्ले द्वितीय, पंकज कोरपे तृतीय क्रमांक पटकाविला.या कार्यक्रमास महाविद्यालयातील रासेयो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुमेध कशीवार, व इतर प्राध्यापक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राहुल चाहांदे यांनी मानले.