News34 chandrapur
चंद्रपूर ः नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत जुनी पेंशनचा मुद्दा गाजला. याच मुद्द्यावर विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी निवडणूक लढविली आणि विक्रमी मतांनी विजयी झाले. विजयी झाल्यानंतर लगेचच त्यांनी या मुद्याला घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जुन्या पेंशनबाबत शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली.
Teacher mla sudhakar adbale
Teacher mla sudhakar adbale
राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना सरसकट लागू करण्यात यावी, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने केली. नागपूर हिवाळी अधिवेशनावर 'एकच मिशन, जुनी पेंशन'चा नारा देत लाखो कर्मचारी धडकले. या मोर्चात सुधाकर अडबाले यांचासुध्दा सक्रीय सहभाग होता. Mahavikas aghadi
सत्ताधाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेंशन सरकार देऊ शकत नाही आणि निवडणुकीदरम्यान आम्हीच पेंशन देऊ शकतो, अशा घुमजाव भूमिकेमुळे सर्व शिक्षकांत सरकारप्रती तीव्र असंतोष पसरला. हाच मुद्दा जानेवारीत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत गाजला. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विमाशिचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेने पुरस्कृत उमेदवार घोषित केले. त्यासोबतच ३६ विविध संघटनांनी पाठिंबा दिला. महाविकास आघाडीनेसुध्दा अडबाले यांना समर्थित उमेदवार म्हणून सक्रिय पाठींबा दिला. अडबाले यांच्याविरुध्द भाजपने मोठी शक्ती पणाला लावली होती. मात्र, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे सुधाकर अडबाले यांच्या पाठीशी सर्व शिक्षक उभे राहिले. शिक्षकांच्या एकजुटीने नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या इतिहासात विक्रमी मताधिक्क्यांनी सुधाकर अडबाले विजयी झाले. विधान भवनातील शपथ ग्रहण समारंभात देखील त्यांनी जुनी पेंशनची टोपी परिधान करूनच शपथ घेतली.
Old pension
Old pension
जुनी पेंशन योजनेबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचा फायदा विधानपरिषद निवडणूक काँग्रेसला झाला. त्याच संदर्भात नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जुन्या पेंशनबाबत शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आमदार अडबाले यांनी केली. जुन्या पेंशनवर आमचं लक्ष असून लवकरच पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत सुध्दा ह्या विषयावर पक्षाच्या वतीने चर्चा केली जाईल, असे या चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार डॉ. मनीषा कायंदे, महाराष्ट्र जुनी पेंशन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, अमरावती विभागीय अध्यक्ष मिलिंदा सोळंकी यांची उपस्थिती होती.