News34 chandrapur
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे.
या योजनेंतर्गत रुग्णांना पाच लाखांपर्यंत आरोग्य विमाच्या माध्यमातून एकूण 1209 उपचार/शस्त्रक्रिया मोफत दिले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात या कार्डचा लाभ मिळू शकणा-या लाभार्थ्यांची संख्या तब्बल नऊ लाख 23 हजार आहे. Ayushman India
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी हे 2011 साली झालेल्या ‘सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना’ च्या आधारावर असून या यादीत नाव असणारे व्यक्ती या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्याकरीता आयुष्मान कार्डची आवश्यकता आहे. हे कार्ड सी.एस.सी. केंद्र / आपले सरकार केंद्र किंवा योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत वितरीत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ही यादी गावनिहाय किंवा वार्डनिहाय https//aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/ या लिंक वर सुध्दा नागरिकांना करीता उपलब्ध आहे. Pradhan Mantri Jan Arogya Yojana
त्याचप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत केशरी, पिवळे, अंत्योदय आणि अन्नपूर्णा राशन कार्डधारक कुटुंबे पात्र लाभार्थी असून यात एकूण 996 उपचार/शस्त्रक्रियेकरिता प्रती वर्ष/प्रती कुटुंब दीड लाखांचा आरोग्य विमा पुरविण्यात येत आहे. महात्मा जनआरोग्य योजनेंतर्गत दीड लाख आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत साडेतीन लाख असे एकूण पाच लाखापर्यंतचे उपचार आरोग्य विमाच्या माध्यमातून मोफत होतात. त्यामुळे उपचारापूर्वी आपले नाव आयुष्मान भारत योजनेत समाविष्ठ आहे का ? याची खात्री करणे आवश्यक आहे.
2 लक्ष 23 हजार पात्र नागरिकांना आयुष्मान कार्ड :आयुष्मान भारत योजनेत 2 लक्ष 15 हजार 920 कुटुंबांचा समावेश असून एकूण 9 लक्ष 93 हजार 232 व्यक्तींना आयुष्मान कार्ड वितरीत करायचे उद्दिष्ठ आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 2 लक्ष 23 हजार पात्र नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात आलेले आहे. त्यांना पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत मिळणार आहे.
नोंदणी कोठे करणार : जिल्हात 691 आपले सरकार केंद्र व 402 सीएससी केंद्र उपलब्ध आहेत. या केंद्रावर लाभार्थाना सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीत नाव असेल तर आधारकार्ड आणि राशन कार्डच्या माध्यमातून मोफत कार्ड प्राप्त करता येते. तसेच यादीत नाव नसेल तर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. 2011 च्या जणगणनेनुसार समाजिक, आर्थिक, जातनिहाय जिल्हातील पात्र लाभार्थी यादी आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे व ही यादी ग्रामपंचायत व शहरी विभागात वार्ड कार्यालय येथे उपलब्ध आहे. Free treatment
आवश्यक कागदपत्र : आयुष्मान कार्ड काढण्याकरीता लाभार्थांजवळ आधारकार्ड व राशनकार्ड असणे आवश्यक आहे.
कोणत्या रुग्णालयात मिळणार उपचार : या योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्हात एकूण 10 रुग्णालय अंगीकृत असून त्यापैकी पाच शासकीय व पाच खाजगी रुग्णालय आहेत. यात चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, मूल, चिमूर आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालय, मुसळे रुग्णालय, मानवतकर रुग्णालय, क्रिस्त रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, डॉ.अजय वासाडे रुग्णालय येथे आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत उपलब्ध सीएससी केंद्र : आशा कॉम्पुटर इंदिरा नगर, उमेश नक्षीने केंद्र इंदिरा नगर, उमरे सीएससी केंद्र रामनगर, श्री इंटरनेट केंद्र रामनगर, आदित्य सर्विस केंद्र बालाजी वार्ड, सचिन निंबाळकर बालाजी वार्ड, युवराज पवार केंद्र बाबूपेठ वार्ड, स्वप्नील वर्भे केंद्र बाबूपेठ वार्ड, एम.के. सायबर कॅफे केंद्र बगड खिडकी, ओम प्रकाश कुमरे केंद्र तुकूम येथे सुध्दा आयुष्मान कार्डची सेवा उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागात ग्रामपंचायतनिहाय आपले सरकार केंद्रांत नागरिकांना सदर कार्ड काढण्यात येत आहे. यादीत नाव असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी त्वरीत आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.
