News34 chandrapur
चंद्रपूर : आज दि. 5 सप्टेंबर 2022 ला "शिक्षक दिनी" काळी फीत लावून राज्यभर जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना प्रलंबित मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ संलग्नित विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा द्वारे निवेदन सादर करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय मागण्यांची पूर्तता करण्याबाबत महासंघाने दि. १७ ऑगस्ट २०२२ ला मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पत्र दिले होते. तथापि, अद्याप राज्य शासनाकडून महासंघासमवेत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही आणि मागण्यांची पूर्तताही झाली नाही. राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबीत असून त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने करून शासनास वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. मात्र, शासनाने मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर खूप मोठया प्रमाणात अन्याय होत आहे व त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. एकेका मागणीसाठी राज्यातील शिक्षक गटागटाने वारंवार आंदोलने करीत आहेत. महासंघाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या एकत्रितपणे मांडलेल्या आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांच्या बाबतीत शासन स्तरावर काहीच कार्यवाही होत नसल्याने राज्य महासंघ सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन देवून त्वरीत चर्चा करावी व मागण्यांची पूर्तता करावी तथा शिक्षकांमधील असंतोष दूर करावा, यासाठी आंदोलनाचे टप्पे ठरवून दिले आहे.
देशाचे नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांवर एका लोकप्रतिनिधीने केलेला शिवराळ भाषेचा वापर हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. वर्गात महान व्यक्तीचे फोटो लावण्याच्या प्रथेला खंडित करून शिक्षकाचे फोटो लावा असा अजब फतवा अधिकाऱ्यानी काढला आहे, या असंवैधानिक बाबी तातडीने थांबल्या पाहिजे अन्यथा शिक्षण क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण होईल व त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. शासन आणि प्रशासन यांची कोणत्याही प्रश्नाला सोडवण्याची तयारी नाही.
या निवेदनात मूल्यांकन प्राप्त घोषित कनिष्ठ महाविद्यालयांना व तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तातडीने तसेच रोखीने अनुदान देण्यात यावे व अघोषितला अनुदानासह घोषित करावे. वाढीव पदांना नियुक्ती दिनांक पासून मान्यता व वेतन देण्यात यावे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. अर्धवेळ शिक्षकांना प्रचलित पद्धतीनुसार रोस्टर प्रमाणे पूर्णवेळ पदावर नियुक्ती देण्यात यावी, आदी व इतर मागण्यांचा समावेश आहे.
संघटना व पदाधिकाऱ्यांना चर्चेला वेळ द्यावा व मागण्या निकाली काढाव्या, अन्यथा तीव्र आंदोलन घेतले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ संलग्नित विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा द्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खाडे, जिल्हा सचिव दिलीप हेपट, कार्याध्यक्ष अशोक पोफळे, प्रसिध्दी प्रमुख रविकांत वरारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश यार्दी, प्रमोद उरकुडे, अनिल डहाके, मनीष पोतनुरवार, रवि जोगी, नत्थु लिंगे, महेश मालेकर, अमोल निब्रड, आदी उपस्थित होते. Teacher day 2022
सदर निवेदनाची प्रत माहिती व कार्यवाहीसाठी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, आयुक्त, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, ना. सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार बंटी भांगडीया, आमदार विजय वडेट्टीवार, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना देण्यात आली आहे.