News34 chandrapur
राजुरा : पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर जनावरांना साथरोगांची लागण होऊ नये यासाठी जनावरांचे लसीकरण करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून केले जात आहे. Animal vaccination
सतत पडणाऱ्या पावसाने वातावरणात झालेल्या बदलामुळे मानवाप्रमाणेच जनावरांवर मोठ्या प्रमाणात आजारांची लागवन झाली असून यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना व गोचीड निर्मूलन करण्यासाठी ग्रामपंचायत चुनाळा व पशुवैद्यकीय अधिकारी राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांचे लसीकरण (दि. ६) चुनाळा येथे घेण्यात आले यात 150 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या लसीकरणाच्या माध्यमातून गोचीड निर्मूलन करणे, निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे, वेषेला आजार संबंधाने चार ते आठ महिन्याच्या गायीचे कालवड व म्हशीच्या वगाराचे लसीकरण करणे, गायी-म्हशींवर उपचार करणे, गर्भ तपासणी, व्यंध्यत्व उपचार यासह अन्य तपासणी व लसीकरण करण्यात आले. याच बरोबर जनावरांच्या पायाच्या खुरांना इजा पोचून त्यामार्फत रोगाची लागण होत असतात अशा वेळी पशुवैद्याच्या मार्गदर्शनानुसार त्यावर उपचार करणे, जनावरांना आजार होऊ नये यासाठी गोठ्यामध्ये घ्यावयाच्या काळजीसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले व निर्जंतुकीकरणासाठी फवारणी औषध देण्यात आले.
शेतीचा हंगाम सुरू असून जनावरांना आजार झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून योग्य वेळी जनावरांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले, यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच बाळनाथ वडस्कर व इतर ग्राम पंचायत पदाधिकारी, पशुवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. सुचिता धांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद जल्लेवार, आदित्य बोबडे, परिचर अलंकार तामगाडगे, अनिल चौहान, अनिकेत मनोहर निमकर व गावातील जनावर मालक उपस्थित होते.