News 34 chandrapur
वरोरा : कल्याणकारी राज्याची संकल्पना राबविताना कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या दुःखाला अग्रस्थानी ठेवून अतिवृष्टीने झालेले त्यांचे नुकसान शासनाने त्वरीत पीक कर्जाची माफी, सानुग्रह अनुदान, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार आदी स्वरूपात भरपाई करुन द्यावे, अन्यथा या विषयावर राज्य शासनाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका टाकू, असे रवि शिंदे यांनी येथे म्हटले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने (दि.३) ला स्थानिक बावणे मंगल कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. Heavy rains
या बैठकीत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे, दत्ता बोरेकर, भास्कर ताजने, धनराज आस्वले, महादेव जीवतोडे, प्रकाश शेळके, कन्हैयालाल जयस्वाल, रामदास डहाळकर, राहुल बलकी, तथा तालुक्यातील शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जुने पीक कर्ज माफ होऊन नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, पीक कर्जाची माफी, सानुग्रह अनुदान, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. आदी विषयावर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सहकारी संस्था या मागणीचे ठराव घेणार असून ते जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला पाठविणार आहेत.
पुढे बोलतांना, मोठ मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करीत नाही, असा सवालही रवि शिंदे यांनी यावेळी केला.
गेल्या महिन्यात झालेल्या अतीवृष्टीने तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील अनेक गावातील शेतपिके पुराने वाहून गेली. शेतातील माती उखळून गेली. परिणामी शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपआपल्या समस्यांना वाचा फोडली व शासनाकडून मदतीची अपेक्षा केली आहे.
शेंबळ येथील शेतकरी अरुण खारकर, तुळाना येथील शेतकरी आशीष ठेंगणे यांनी म्हटले की, शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी तथा नियमित कर्ज भरणार्यांना मागील वर्षीचे ५० हजार रु. अनुदान त्वरीत देण्यात यावे. खांबाळा येथील शेतकरी प्रकाश शेळकी म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी. आमडी येथील शेतकरी गोपाळ ढवस म्हणाले की, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करुन द्यावे तथा शेतात पडलेले इलेक्ट्रिक खांब सरळ उभे करुन विज पुरवठा त्वरीत पूर्ववत करावा. बेंबळ येथील शेतकरी दयाराम नन्नावरे म्हणाले की शेतीपूरक व्यवसायाकरीता शेतकऱ्यांनी कर्ज काढले, मात्र ओल्या दुष्काळामुळे शेतकरी कर्ज भरु शकणार नाही. सरसकट कर्जमाफी आवश्यक आहे. सोबतच जंगलव्याप्त शेतीला सौर कुंपण करून द्यावे. मारडा येथील शेतकरी धनंजय पिंपळशेंडे म्हणाले की आपल्याकडे शेतकरी खरीप व रब्बी पिके घेतात तर खरीप पिकांना मिळते तसे रब्बी पिकांना देखील पीक कर्ज पुरवठा करण्यात यावा.
यावेळी शेतकऱ्यांनी समस्यांचा फाडाच वाचला, तेव्हा काहींना सभागृहात अश्रू आवरता आले नाही. आता हे सर्व शेतकरी राज्य शासनाकडे आस लावून बसले आहेत.
शेतकऱ्यांना जमेल तेव्हढे सहकार्य करत राहू, प्रशासनाला तगादा लावून मागण्या मंजूर करण्यासाठी बाध्य करु, असे यावेळी रवि शिंदे म्हणाले.

